शबनम न्युज | प्रतिनिधी
पिंपरी दि.३० ऑगस्ट २०२३:- आज सकाळी पूर्णानगर येथील दुकानास लागलेल्या आगीत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यु झाला असून मृतांप्रती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शोक व्यक्त केला आणि कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
पूर्णानगर चिंचवड येथील जुन्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील पुजा हाईट्समधील एका हार्डवेअरच्या दुकानाला पहाटे आग लागली. या घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने त्वरीत कार्यवाही करून आग विझवली.या दुर्घटनेत राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील चिमणाराव बेणाराम चौधरी(वय ४१), नम्रता चिमणाराम चौधरी ( वय ३८), भावेश चिमणाराम चौधरी ( वय १५), सचिन चिमणाराम चौधरी (वय १३) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच आगीत दुकानाचे नुकसान देखील झाले आहे.
या दुर्घटनेचे वृत्त समजताच आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी लगेचच घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला तसेच त्यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात मृतांच्या नातेवाईकांचीही भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.
घटनास्थळी पोलीस उप आयुक्त डॉ.काकासाहेब डोळे,क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे,सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात,मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे,विशेष अधिकारी किरण गायकवाड,अग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे,उदय वानखेडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, वरिष्ठ पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर काटकर,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल,अग्निशमन विभागाचे जवान,सुरक्षारक्षक उपस्थित होते.
आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून पोलीस, महापालिका आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.