शबनम न्यूज . प्रतिनिधी :
आज रहाटणी मध्ये मराठा समाज बांधवांच्या वतीने एक दिवसीय उपोषण आंदोलन करण्यात आले. एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे’, ‘मनोज जरांगे हम तुम्हारे साथ है’ अशा गगनभेदी घोषणा देत अवघा आसमंत दणाणून सोडला. या आंदोलनात बाजार रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातील सखल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये माजी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दिला.
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागत आहे. पिंपरी चिंचवड शहरासह राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहेत. मागील काही वर्षापासून मराठा बांधव आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होता. मात्र, यातून तोडगा न निघाल्यामुळे मराठा समाज आज रस्त्यावर उतरला आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी काटे यांनी केली आहे.
छत्रपतींच्या महाराष्ट्रात मराठा समाजच वंचित राहिला आहे. मराठा समाज कोणाच्या हक्काचे काढून आरक्षण मागत नाही. फक्त हक्काचे आहे, त्याचीच मागणी करत आहे. राज्यातील आणि केंद्रातील सरकारने दहा टक्के ई. डब्लू. एस. आरक्षण व विविध मंजूर कामांची घोषणा न देता जीआर काढून अंमलबजावणी करावी. त्यामुळे संपूर्ण मराठा समाजाची उन्नती होणार आहे. तरी सरकारने मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण द्यावे असे नाना काटे यांनी यावेळी आंदोलनात सहभाग घेत आपले मत नोंदविले.