शबनम न्युज | मुंबई
शरद पवार स्वतः कामासाठी जातात. मात्र जनाची नाही, पण मनाची तर आहे. 80 वर्षाच्या वडिलांना कोर्टात एकटं जाऊ देणार नाही, असे मत शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. त्या सोमवारी एका सभेत बोलत होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाली आणि फूट पडून शरद पवार गट आणि अजित पवार गटात पक्षावरील मालकीवरून वाद निर्माण झाला. यावर आता केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी हे खटले आणि त्याच्या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणाल्या, “सगळ्या जबाबदाऱ्या असतात. माणूस सगळं तर करू शकत नाही. मुलं, नवरा, कुटुंब यांच्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वेळच नाही. मतदारसंघ बघायचा, की पक्षाची कामं बघायची की कोर्टातील खटले बघायचे. शरद पवार स्वतः या कामांसाठी जातात. मात्र, जनाची नाही, पण मनाची तर आहे. ८० वर्षांच्या वडिलांना मी कोर्टात एकटं जाऊन देणार नाही.”
“मतदारसंघातील अर्धा वेळ खटले लढण्यात जात आहे. पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. हारेंगे या जितेंगे, बाद में देखेंगे, मगर लढेंगे जरूर. आपल्याकडे म्हणतात कोर्टाची पायरी चढू नये. मात्र, आम्ही चढलो. आता एकदा कोर्टाची पायरी चढल्यावर उतरायचं नाही,” असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.