शबनम न्युज | चंद्रपूर
विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकुलात 27 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरणार आहे. या निमित्ताने चंद्रपूरकरांना राष्ट्रीयस्तरावरील क्रीडा स्पर्धांचा आनंदही घेता येणार आहे. 2036 मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याचा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यामुळे मिशन ऑलिम्पिकच्या निमित्ताने उत्कृष्ट खेळाडू घडविण्याचे उद्दिष्ट ठेऊनच बल्लारपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे नियोजन करावे, असे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. त्याचवेळी या स्पर्धा अतिशय दर्जेदार आणि उत्तम होतील, असा विश्वास क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.
पालकमंत्री श्री. मुनगंटीवार आणि क्रीडा मंत्री श्री. बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन सभागृह येथे क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभिषण चवरे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, हरीश शर्मा, देवराव भोंगळे, राहुल पावडे यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.