शबनम न्युज | पिंपरी
निगडी पाटीदार भवन सभागृह पिंपरी चिंचवड मध्ये झालेल्या प्रथम संत साहित्य संमेलनामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरु संत तुकाराम महाराज सतपीठ स्कूल अॅन्ड ज्यु. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला.
संतपीठाचे संचालक ह.भ.प. राजू महाराज ढोरे, संचालिका डॉ. स्वाती मुळे, प्राचार्य डॉ ज्ञानेश्वर गाडगे, मुख्याध्यापिका स्नेहल पगार आणि समन्वयिका मयुरी मुळुक यांच्या मार्गदर्शनाखाली संत तुकाराम महाराजांच्या अर्भकासाठी पंते हाती धरिली पाटी या अभंगाचा अर्थ सांगणारी नाटिका इंग्रजी भाषेतून सादर केली. ज्याप्रमाणे शिक्षक एक-एक अक्षर गिरवून विद्यार्थ्यांना घडवतो, एक आई आपल्या बाळाला बोटाला धरून चालायला शिकवते, त्याचप्रमाणे संत, संतांचे विचार व आचरण समाजाला दिशा देण्याचे कार्य करतात हा संदेश दिला.
या नाटिकेसाठी गायन- ह.भ.प. राजू महाराज ढोरे व गायत्री थोरबोले, पखावज- अविनाश भोगिल तबला- विवेक भालेराव, संवाद वाचन- अनिरुद्ध मोरे, भालचंद्र रोडे, राजाभाऊ फड, नेहा नाफडे यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित मा. आमदार महेशदादा लांडगे यांनी संतपीठ शाळेच्या उभारणी पासूनचा इतिहास सांगितला, तसेच संगीत नाटिकेचे कौतुक करत असताना संत साहित्य इंग्रजी भाषेतून शिकवले जाणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
ह.भ.प. किसन महाराज चौधरी यांनी जीवनगौरव पुरस्कार स्विकृतीबाबत कृतज्ञता व्यक्त करताना संतपीठ नाटिकेचे भरभरून कौतुक केले व संतपीठास शुभेच्छा दिल्या. तसेच अध्यक्षीय भाषणाच्या दरम्यान विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी संतपीठ येथील विद्यार्थ्यांच्या चार भाषेवर असलेल्या प्रभूत्वाबाबत विशेष कौतुक केले.