शबनम न्युज | पुणे
के. चंद्रशेखर राव यांची दहा वर्षांची सत्ता उलथवून टाकत काँग्रेसने तेलंगणामध्ये मोठा विजय मिळवला. या यशात पुण्यातील भावी खासदारांचा उल्लेखनीय वाटा राहिला आहे. पुण्यातील लोकसभेचे संभाव्य उमेदवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांच्याकडे तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने पेड्डापल्ली लोकसभा क्षेत्रात निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली होती. यात चेन्नूर, बेल्लामपल्ली, मंचेरीयाल, धर्मापुरी, रामागुंडम, मंथनी, पेड्डापल्ली या सातपैकी सात पैकी सात विधानसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार दणदणीत विजयी झाले.
तेलंगणा राज्याच्या इतिहासातील ही निवडणूक ऐतिहासिक होती. या निवडणुकीत केसीआर यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस उमेदवारांनी केसीआर यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांचा पराभव केला. तेलंगणा काँग्रेसने गेल्या वीस वर्षांतील सर्वोत्कृष्ट कामगिरी या निवडणुकीत केली आहे. कसब्यातील रवींद्र धंगेकर यांच्या विजयात, कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयात महत्वाचे योगदान दिल्यानंतर तेलंगणाच्या विजयातही महत्वाची भूमिका निभावणारे योगदान देणाऱ्या मोहन जोशी यांचा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एहसान खान, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे, पुष्कर आबनावे, ऋत्विक धनवट आदी उपस्थित होते.
मोहन जोशी म्हणाले, “काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास टाकत तेलंगणा विधानसभा निवडणुकीत मला पेड्डापल्ली लोकसभा मतदारसंघात निरीक्षक म्हणून काम करण्याची संधी दिली. येथील काँग्रेस नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा विजय झाला. सातपैकी सात मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले याचा आनंद आहे. काँग्रेसचा विचार जनमानसात रुजवण्याची आज गरज आहे. आगामी लोकसभा व विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळेल आणि देशात काँग्रेसचे सरकार स्थापन होईल.”