सुप्रसिद्ध गजलकार कवी विजय वडवेराव यांचा सन्मान
शबनम न्युज | पिंपरी
येथील साहित्य सम्राट संस्थेचा शतकोत्तर अमृत महोत्सव सोहळा विशाल सह्याद्री सदन येथे पार पडला. या कार्यक्रमात संस्थेच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवानिमित्त कवी विजय वडवेराव यांच्या भिडेवाडा बोलला या कवितेस राज्यस्तरीय काव्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
भिडेवाडा बोलला ही कविता पुणे बुधवार पेठ स्थित असणाऱ्या देशातील पहिल्या शाळेवर आधारित आहे.यावेळी ज्येष्ठ गजलकार म.भा चव्हाण,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रभाकर देसाई, बार्टी संस्थेच्या निबंधक इंदिरा डावरे तसेच म.न. पा.पुणे मराठी भाषा संवर्धन समितीचे सदस्य अनिल गोरे यांच्या हस्ते विजय वडवेराव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाडयात देशातील मुलींची जी पहिली शाळा सुरू केली होती तिची सध्या जी दयनीय अवस्था झालेली आहे त्याबाबत भिडेवाड्याचे आत्मकथन मांडणारी भिडेवाडा बोलला ही कविता विजय वडवेराव यांनी २०१४ साली लिहिली.वडवेराव यांनी स्वतः अनेकवेळा आपले कुटुंबीय, मित्रपरिवार यांना सोबत घेऊन भिडेवाड्यातील देशातील ही मुलींची पहिली शाळा स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता अभियान राबवले आहे. देशातील मुलींच्या पाहिल्या शाळेची दुरवस्था त्यांनी अनेक शाळांत ,कॉलेजात जाऊन विद्यार्थी, शिक्षक, यांच्या समोर आपल्या कवितेच्या स्वरुपात मांडून या मोडकळीस आलेल्या शाळेच्या ठिकाणी भव्यदिव्य राष्ट्रीय स्मारक उभारावे यासाठी जनजागृती करण्याचे कार्य गेली नऊ वर्षे सातत्याने केले आहे. विजय वडवेराव हे मुळशी तालुक्यात जिल्हापरिषद प्राथिक शाळा गोडांबेवाडी नं.१ येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत एक शिक्षक व साहित्यिक म्हणून त्यांचे हे सामाजिक कार्य समाजातील प्रत्येक घटकास प्रेरणादायी आहे असे गौरवोदगार साहित्य सम्राट या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद अश्टूळ यांनी काढले.राज्यस्तरीय काव्य गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून कवी विजय वडवेराव यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.