शबनम न्युज | अमरावती
क्रेडाई अमरावतीमार्फत जिल्ह्यात ‘ग्रॅण्ड प्रॉपर्टी एक्स्पो 2023’ चे आयोजन करण्यात आले. या प्रॉपर्टी एक्सपोला आज उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी भेट दिली. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाठी प्रलंबित असलेली कामे नागपूर अधिवेशन कालावधीत मार्गी लावू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिली.
सायन्स स्कोर मैदान येथे ‘ग्रॅण्ड प्रॉपर्टी एक्स्पो 2023’ ला सुरुवात झाली असून ते दि. 11 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. आमदार प्रविण पोटे पाटील, आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, मनपा आयुक्त देविदास पवार, क्रेडाई अमरावतीचे अध्यक्ष निलेश ठाकरे, उपाध्यक्ष कपिल आडे, सचिव रवींद्र गोरटे आदी यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, प्रत्येकाला घर मिळावे, यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. म्हाडाच्या माध्यमातून राज्यात अनेक प्रकल्प सुरु असून गरजूंना त्यांच्या स्वप्नातील घरे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन स्वस्त व चांगल्या दर्जाच्या सुविधायुक्त घरे ग्राहकांना उपलब्ध करुन द्यावीत. बांधकाम व्यावसायिकांसाठी शासनामार्फत अनेक योजना व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. यामुळे बांधकाम क्षेत्रात अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यात अनेक प्रलंबित समस्या आहेत. त्या मार्गी लावण्यासाठी नागपूर अधिवेशन कालावधीत बैठक घेवून अधिवेशन संपण्यापूर्वी ते मार्गी लावू. बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेली ‘गटार योजना’ पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देवू. तसेच जिल्ह्यातील डिपीआर संदर्भातील समस्या, घर व भाडे इमारतीवरील वाढीव दराने लावलेले कर या संदर्भात आढावा घेवून ते कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत आश्वस्त केले.