शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आकुर्डी व पिंपरी येथे उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांना सदनिकांची संगणकीय सोडत प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे शनिवार (दि. 20 जानेवारी 2024) रोजी सकाळी 9 वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोरे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह असणार आहे. तर खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग बारणे ,खासदार अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, आमदार संग्राम थोपटे ,आमदार अण्णा बनसोडे, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तसेच या प्रकल्पातील लाभार्थ्यांनी 20 जानेवारी रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे उपस्थित राहण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आकुर्डी व पिंपरी येथे स्वस्त घरकुल योजना प्रकल्प राबविण्यात आलेले आहेत.सदर योजनेस मा.महापालिका सभेने ठराव क्र.३९, दि.२०/०६/२०१७ अन्वये मान्यता दिलेली आहे.सदर प्रकल्पांच्या सदनिकांकरिता लाभार्थी निश्चित करणेकामी दि.२८/०६/२०२३ ते ३१/०८/२०२३ या कालावधीत नागरिकांकडून अर्ज मागविणेत आले आहेत. आकुर्डी प्रकल्पाकरिता ६६७२ अर्ज व पिंपरी प्रकल्पाकरिता ४६१५ असे एकुण ११२८७ इतके अर्ज प्राप्त झालेले आहेत. या प्रकल्पामध्ये आकुर्डी येथे ५६८ तर पिंपरी येथे ३७० अशा एकूण ९३८ सदनिका आहेत.
या योजनेकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग व इतर याप्रमाणे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरक्षण आहे. या योजनेची सोडत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या Facebook पेजवर (Link – www.facebook.com/pcmcindia.gov.in ) थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे. तसेच प्रा.रामकृष्ण मोरे सभागृहाच्या बाहेरील एल.ई.डी. वॉल वर थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे. या योजनेकरिता ९३८ सदनिकांची निवड यादी व प्रतिक्षा यादी क्र.१ असणार आहे. सोडतीचा सविस्तर तपशिल महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर व वर्तमानपत्रात प्रसिध्द करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी दिली.