शबनम न्युज | सोलापूर
केंद्र शासन गोरगरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेतून रे नगर येथे तयार झालेला देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प होय. या गृहप्रकल्पामुळे येथील हजारो गोरगरीबांनी अनेक पिढ्यांपासून पाहिलेले घराचे स्वप्न साकार होत असल्याचा आनंद आहे, असे भावोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील रे नगर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निर्माण होत असलेल्या 30 हजार घरकुलांपैकी पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरकुलांच्या वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, विजयकुमार देशमुख तसेच रे नगर हौसिंग फेडरेशनचे संस्थापक आणि मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रधानमंत्री मोदी पुढे म्हणाले, जागतिक स्तरावर भारताचे महत्त्व वाढत असून त्यात छोट्या उद्योगांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. विकसित भारत होण्यास आत्मनिर्भर भारत बनणे गरजेचे आहे. त्यासाठी सुक्ष्म, लघु व कुटीर उद्योगांची भूमिका खूप मोठी आहे. त्याकरिता अशा उद्योगांना केंद्र शासन प्रोत्साहन देत आहे. त्यातून मेड इन इंडिया उत्पादकांसाठी मोठ्या आशा वाढल्या आहेत. अशा प्रयत्नातूनच आगामी काळात भारताची अर्थव्यवस्था जगातील अग्रक्रमांकाच्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे मोदी यांनी सांगितले.