शबनम न्युज | पिंपरी
शिक्षक विकास कार्यक्रमांतर्गत पुणे सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे सर्व विभाग प्रमुख तसेच प्राध्यापक यांनी निगडी येथील पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि.च्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी) आणि ऑटो क्लस्टर येथील पीसीएमसी स्टार्ट-अप इनक्युबेशन सेंटर येथे भेट दिली. तसेच, स्मार्ट सिटी प्रकल्पांची माहिती घेतली. “स्मार्ट शहरांची निर्मिती: शाश्वत भविष्यासाठी धोरणे” या विषयाच्या अनुषंगाने हा उपक्रम घेण्यात आला.
इंटीग्रेटेड कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटरच्या भेटीदरम्यान गौरव शर्मा, श्रीकृष्ण हिंगमिरे, अक्षय उखळकर यांनी एकात्मिक निरीक्षण प्रणाली, घनकचरा व्यवस्थापन डेटा प्रणाली, सिटी इन्फॉर्मेटिव्ह सिस्टीम (मेसेजिंग सिस्टीम) बद्दल प्रात्यक्षिक सादरीकरणाद्वारे माहिती दिली. जस्टिन मॅथ्यू, आशिष चिकणे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकृत अॅप्लिकेशन पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅपची माहिती सांगितली.
तसेच, पीसीएमसी स्मार्ट सारथीचे (पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकृत अॅप्लिकेशन) ऑनलाइन सेवा-सुविधा, तक्रार निवारण योजना, योजना आणि सुविधांची माहिती, हेल्पलाइन इत्यादी विविध फायदे देखील विषद केले. ऑटो क्लस्टर येथे स्टार्ट-अप इनक्युबेशन सेंटरचे व्यवस्थापक उदय देव यांनी स्टार्ट-अपला सहाय्य करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या इको सिस्टीमची माहिती दिली. या उपक्रमाद्वारे आतापर्यंत ५२ स्टार्ट अप्सना मदत झाली असून एकूण ३० पेक्षा अधिक व्यक्तींनी यामध्ये सहभाग नोंदविल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या उपक्रमांत सहभागींनी प्रश्नोत्तराद्वारे प्रकल्पांची बारकाव्यानिशी माहिती जाणून घेतली.