शबनम न्युज :पिंपरी
“कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलात तरी देशसेवेसाठी हातभार लावा!” असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त मुकुंद कुलकर्णी यांच्या हस्ते क्रांतितीर्थ, चापेकर वाडा, चिंचवडगाव येथे शुक्रवार, दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी तिरंगाध्वज फडकविण्यात आला. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, सह कार्यवाह डॉ. नीता मोहिते, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, नगर कार्यवाह भास्कर भोर, समिती विश्वस्त मिलिंद देशपांडे, नितीन बारणे, सुहास पोफळे, अविनाश आगज्ञान, शार्दूल पेंढारकर तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
मुकुंद कुलकर्णी पुढे म्हणाले की, “आपले दैनंदिन कर्तव्य पार पाडत असताना शालेय विद्यार्थ्यांपासून ते सर्व क्षेत्रांतील नागरिकांनी आपल्या परीने देशाच्या प्रगती आणि समृद्धीसाठी योगदान दिले पाहिजे!”
गिरीश प्रभुणे यांनी प्रास्ताविकातून, “पाचशे वर्षांच्या बंदिवासातून मुक्त झालेल्या रामलल्लाची नुकतीच अयोध्या येथे प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आलेल्या हा अमृतमहोत्सवी प्रजासत्ताकदिन भारतीयांसाठी रामराज्याचे शुभसंकेत घेऊन आला आहे. आपण सर्वांनी त्याचे मनापासून स्वागत करू या!” असे विचार मांडले.
यावेळी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, क्रांतिवीर चापेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच थेरगाव येथील खिंवसरा पाटील विद्यामंदिर, लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय, क्रांतिवीर बाळकृष्ण चापेकर बालक मंदिर येथे तिरंगा फडकावून प्रजासत्ताकदिन सोहळा साजरा करण्यात आला.
लावण्या गोडबोले, अतुल आडे, वर्षा जाधव यांच्यासह क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती पदाधिकारी यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. राहुल बनगोंडे यांनी आभार मानले.