शबनम न्यूज | पिंपरी
भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव याच्या हस्ते येत्या गुरुवारी (दि. ८ फेब्रुवारी) सिंधी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेच्या पाचव्या पर्वाचे उद्घाटन होणार आहे. ही स्पर्धा यंदा ८ फेब्रुवारी ते २ मार्च २०२४ या कालावधीत पिंपरी येथे होणार आहे. यंदा महिलांच्या क्रिकेट सामान्यांचेही आयोजन केले असून, १६ पुरुष संघ व ६ महिला संघ सहभागी होणार आहेत. पिंपरी येथील एमसीसी, मृणाल क्रिकेट ग्राउंडवर होणाऱ्या या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सिंधी प्रीमिअर लीग फेसबुक पेजवरून पाहता येणार आहे.
संयोजक हितेश दादलानी म्हणाले, “देशभरातील सिंधी समाज एकत्रित यावा व मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे आणि खेळातून उभारलेल्या निधीचा समाजासाठी उपयोग व्हावा, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली जाते. सिंधी समाजातील उद्योजक तरुणांनी एकत्र येऊन या क्रिकेट लीगचे आयोजन केले आहे. स्पर्धेतून मिळालेला निधी सामाजोपयोगी आणि विधायक कामासाठी देण्यात येतो”
कन्वल खियानी म्हणाले, “गेल्या चार हंगामात झालेल्या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. स्पर्धेला व्यापक स्वरूप येत असून, पुण्यासह परभणी, जळगाव, नांदेड, बंगळुरू येथूनही खेळाडू सहभागी होत आहेत. आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेची रचना करण्यात आली आहे. यंदा महिलांनाही खेळासाठी प्रोत्साहन दिले जात असून, महिलांचे सहा संघ स्पर्धा खेळणार आहेत. पुरुषांचे १६ संघमालक व महिलांचे ६ संघमालक आपल्या २२ संघांसह स्पर्धेत उतरणार आहेत.”
या स्पर्धेतील पुरुष गटाच्या प्रत्येक संघाचे नाव सिंधी संस्कृतीशी, तर महिला संघांचे नाव नद्यांशी निगडित आहे. पुरुषांच्या संघात मस्त कलंदर, सुलतान ऑफ सिंध, मोहेंजोदरो वॉरियर्स, सिंधफूल रेंजर्स, एसएसडी फाल्कन, इंडस डायनामॉस, दादा वासवानीज ब्रिगेड, झुलेलाल सुपरकिंग्ज, हेमू कलानी ग्लॅडिएटर्स, गुरुनानक नाइट्स, संत कंवरम रॉयल्स, आर्यन्स युनायटेड, जय बाबा स्ट्रायकर्स, सिंधी इंडियन्स, अजराक सुपरजायंट्स व पिंपरी योद्धाज अशी, तर महिला संघात गंगा वॉरियर्स, कावेरी क्रुसेडर्स, गोदावरी जायंट्स, झेलम क्वीन्स, सिंधू स्टारलेट्स आणि यमुना स्ट्रायकर्स यांचा समावेश आहे.