लेखिका | गजाला सय्यद
सध्या महाराष्ट्राचे वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेले आहे. महाराष्ट्रात आजवर अनेक घटना अशा घडतात, ज्या उचलून वर आणल्या जातात. मात्र चूक-अचूक यात देखील मोठा भेदभाव होताना दिसतो. साहजिकच आपल्या राज्यात चुकीच्या गोष्टीचे विरोध कळण्याएवजी त्यास प्रोत्साहन दिले जात आहे आणि अचूक गोष्ट तर समोर येतच नाही. सध्या राज्यात जे घडतंय ते सर्वांना दिसते, मात्र कोणीही पुढे येण्यास तयार नसते. राज्यात घडणार्या घटना या राजकारणातून निर्माण झाल्याच्या देखील पाहावयास मिळतात. आपल्या राज्यात नुकतेच २ हत्या अनैतिक प्रकारे घडल्या. गुन्हेगारी विश्वात वाढ होताना दिसत असतानाच जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्या गाडीच्या काचा फोडून दगड फेक करण्यात आले. आपल्याच राज्यात पत्रकारांचा अशा प्रकारे सन्मान हा दुर्दैवी आहे.
घटना अशी आहे की, निखिल वागळे जे एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व असणारे जेष्ठ पत्रकार आहेत, त्यांनी आपल्या भारताचे उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. लालकृष्ण आडवाणी यांना नुकतेच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाले, यावरून त्यांनी आपले मत व्यक्त केले. वागळे यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर त्यांच्या बद्दल लिहिले कि, “आडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाब्बासकी!”….आता हे सर्व ऐकून पक्षाचे नेते, कार्यकर्ते भडकले. वागळे यांनी चुकीचे वक्तव्य केले असल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या वतीने करण्यात आली आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला.
या तापलेल्या वातावरण दि. ०९ फेब्रुवारी रोजी पुणे येथे निखिल वागळे, अॅड असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांचे ‘निर्भय बनो’ कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र आता सदर कार्यक्रम होऊ देणार नसल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आली. पुण्यात वागळे यांनी येऊ नये, यासाठी प्रयत्न ही करण्यात आले आणि कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर मोठ्या प्रमाणात तेथे राडा झालाच आणि निखिल वागळे कार्यक्रम स्थळी जात असतानाच त्यांच्या गाडीवर देखील कार्यकर्त्यांनी दगड फेक तसेच काचा फोडत हल्ला केला. त्यांच्या समवेत विश्वंभर चौधरी आणि ॲड. असीम सरोदे होते. या हल्ल्यानंतर राज्यातून मोठ्या प्रमाणात या घटनेचा निषेध होत आहे. पत्रकारांवर अशा प्रकारे होणार्या घटनेच्या निषेधार्थ सर्व पत्रकार संघटना, राजकिय पक्ष तसेच नागरिकांकडून देखील निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हे दाखल असून, मात्र अटक करण्यात आलेले नाही, हल्लेखोरांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या सहाय्याने शोधून काढावे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघाने केली आहे. निर्भिडपणे सत्य मांडणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होत असतात. पण अशा हल्ल्यांमुळे पत्रकारांचा आवाज दाबता येणार नाही, हे हल्लेखोरांनी लक्षात ठेवावे. किंबहुना पत्रकारांची लेखणी अधिक बाणेदारपणे अन्यायाविरुद्ध आणि झुंडशाहीविरुद्ध आवाज उठवित राहील, असेही मुंबई मराठी पत्रकार संघाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आपली प्रतिक्रिया देत म्हंटले आहे की, या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिली.
साहजिकच पत्रकारांवर हल्ले होणे एवढे सोपे नाही. पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा दाखविण्याचा काम करणारा व्यक्ति असतो. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता ओळखली जाते, पत्रकारांवर होणारे हल्ले अर्थातच लोकशाहीला मिटविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. संविधान अंतर्गत देशातील प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार आहे, त्याच प्रकारे पत्रकारांना समाजासाठी बोलण्याचा अधिकार असतो. निखिल वागळे यांनी त्यांच्या मते भूमिका ठेवली, यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, विशेष त्यांच्यावर जीवघेणा हल्ला देखील झाला, यानंतर एक पत्रकार म्हणून ते ठाम उभे आहेत. राज्यात पत्रकारांसाठी पत्रकार सुरक्षा कायदा देखील लागू करण्यात आला आहे. याअंतर्गत प्रसारमाध्यमातील व्यक्ती आपली कर्तव्ये पार पाडत असताना त्यांच्यावर होणाऱ्या हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि प्रसारमाध्यमातील व्यक्ती किंवा प्रसारमाध्यम संस्था यांच्या मालमत्तेचे नुकसान किंवा हानी होण्यास प्रतिबंध करण्यासाठी तसेच तत्संबंधित व तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम २०१७ तयार करण्यात आला आहे.
ही सर्व घटना घडल्यानंतर निखिल वागळे यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हंटल आहे की, "जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, तोपर्यंत आम्ही संघर्ष करणार. या भारताचा 'हिंदू पाकिस्तान' होऊ देणार नाही. ही साधी लढाई नाही, ही फॅसिझमविरोधातली लढाई आहे," असंही वागळे म्हणाले. "जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर आणि सर्व संतांचा आशीर्वाद आहे, तोवर तुम्ही आम्हाला संपवू शकत नाही," असं वागळे म्हणाले.
लोकशाहीवादी राजकीय व्यवस्था असणाऱ्या देशातील पत्रकारांचे जीवन सुरक्षित राहिलं नाही. चुकीच्या गोष्टीवर आवाज उठविणा-या पत्रकारांवर हल्ले होणे, मारहाण होणे हे लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे.