शबनम न्युज : प्रतिनिधी
पुणे ,निगडी:- मातंग साहित्य परिषद आयोजित दुसरे मातंगऋषी साहित्य संमेलन मोठ्या थाटामाटात रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी,काळेवाडी,पुणे येथे सकाळी ७.३० ते रात्री ९ पर्यंत संपन्न झाले. साहित्य संमेलनास पद्मश्री गिरीशजी प्रभुणे हे संमेलनाध्यक्ष होते तर मा.शंकरशेठ जगताप यांनी स्वागताध्यक्ष म्हणून काम पाहिले.डॉ. धनंजय भिसे निमंत्रक होते.सकाळी ७.३० ला सुरु झालेल्या कार्यक्रमात महायज्ञ,ग्रंथदिंडी,शबरी काव्यकट्टा तथा काव्यसंमेलन उद्घाटन,शिवकालीन शस्त्र प्रदर्शन उद्घाटन,परिसंवाद,गजल मुशायरा, कार्य गौरव पुरस्कार,साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे वाड्मय पुरस्कार वितरण असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. खेळीमेळीच्या वातावरणात दुसरे मातंग ऋषी साहित्य संमेलन संपन्न झाले.
या कार्यक्रमात सरस्वती माध्यमिक विद्यालय आकुर्डी,पुणे ३५ च्या शिक्षिका,कवयित्री,लेखिका सौ.प्रतिमा अरुण काळे यांना त्यांच्या ‘आईची प्रतिमा’ व ‘महेश्वरची महाश्वेता’ या दोन प्रातिनिधिक काव्य संग्रहांना उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे वाड्मय पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले.
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे वाड्मय पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.