शबनम न्युज | मुंबई
“शरद पवारांना राजीनामा द्यायचा नव्हता, परंतु ते दुखावले गेले होते. या लोकांनी सातत्याने भाजपा, भाजपा, भाजपा आग्रह धरला होता. त्यामुळे ते दुखावले गेले होते. त्यातून त्यांनी राजीनामा दिला,” असा गोप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
त्या म्हणाल्या, एकीकडे राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी म्हणायचे आणि दुसरीकडे पडद्यामागून राष्ट्रवादीसोबत युतीची चर्चा करायची, ही भाजपाची नीती आहे. हा भाजपाचा दुतोडीपणा नाही का? याचे स्पष्टीकरण भाजपाने दिले पाहिजे. लोकांनी सातत्याने भाजपा, भाजपा आग्रह धरल्याने पवार दुखावले गेले होते. त्यातून तो राजीनामा दिला. शरद पवाराला राजीनामा देण्याची अजिबात इच्छा नव्हती, तुम्हाला ती नाटके वाटत असतील पण आमच्यासाठी ते वास्तव होते. महाराष्ट्राची जनता, कार्यकर्त्यांचा आग्रह पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, असा होता. त्या व्यासपीठावर समिती वगैरे काही नको, तुम्हालाच अध्यक्ष करावे लागेल, असं भुजबळ म्हणाले होते.
दरम्यान, काही वयानंतर आपल्यावर जबाबदाऱ्या येतात. भुजबळ म्हणाले त्यावर मीही बोलू शकते. वैयक्तिक गोष्टी बाहेर बोलायच्या नसत्या. मी काही लपवत नाही. मी रोज एक डायरी लिहिते, दिवसभर ज्या गोष्टी आयुष्यात घडतात ते मी डायरीत लिहिते, त्यामुळे भुजबळांच्या मुलाखतीतील घटना आणि माझ्या डायरीतील घटना मी जुळवून पाहिल्या. ती माझी सवय आहे. मला लहानपणापासून सवय आहे. २ जुलैच्या शपथविधीपूर्वी रात्री काय चर्चा झाली हे माझ्या डायरीत लिहिलंय आहे. परंतु ती डायरी बाहेर येणार नाही. एवढी मी प्रगल्भ आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.