शबनम न्युज | मुंबई (वृत्तसंस्था)
अखेर महाराष्ट्राच्या लाडक्या दगडूला अर्थातच अभिनेते प्रथमेश परबला त्याची पराजू (प्राजू) मिळाली आहे. आज मराठी अभिनेते प्रथमेश परबने त्याची प्रेयसी क्षितीजा घोसाळकर तिच्यासोबत लग्न गाठ बांधली. १४ फेब्रुवारीला प्रथमेशचा थाटामाटात साखरपुडा पार पडला. त्यानंतर सर्व चाहत्यांना त्यांच्या लग्नाची आतुरता होती. अखेर प्रथमेश लग्नबंधनात अडकला आहे. क्षितीजा घोसाळकरशी आज प्रथमेशने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. अभिनेत्याने स्वतः लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी जाहीर केली आहे.
अभिनेता प्रथमेश परबने लग्नाचे फोटो शेअर करत लिहिलं आहे, “अखेर लॉकडाऊन लव्हस्टोरीचे हृदय कायमसाठी लॉक झाले.” या लग्नाच्या फोटोंमध्ये दोघंही फार सुंदर दिसत असून खूप आनंदात पाहायला मिळत आहे. लग्नासाठी दोघांनी खास पारंपरिक लूक केला होता.
लग्नात क्षितीजाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती, ज्यावर गुलाबी रंगाची शाल घेतली होती. तसेच प्रथमेशने पांढऱ्या रंगाचा सदरा घातला होता आणि बायको क्षितीजाला मॅचिंग करण्यासाठी त्याने गुलाबी रंगाची धोती परिधान केली होती. याशिवाय प्रथमेशने गुलाबी व पिवळ्या रंगाचा फेटाही बांधला होता.
प्रथमेशची बायको क्षितीजा फॅशन मॉडेल आहे. तसेच ती बायोटेक्नॉलिजिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. क्षितीजाला लिखाणाची खूप आवड आहे. तिला खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यात रस आहे. क्षितीजा कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये काम करते. ‘गजर तुझा मोरया’ या लोकप्रिय गाण्यात प्रथमेशची बायको झळकली होती.