शबनम न्युज | तळेगाव दाभाडे
कोणत्याही परिस्थितीत खासदार श्रीरंग बारणे यांचे काम करणार नाही, मावळ लोकसभा मतदारसंघातून बाळा भेगडे यांचे नाव भाजपचे उमेदवार म्हणून निश्चित करावे, या मागणीसाठी जिल्हा अध्यक्ष मावळ तालुका कोअर कमिटी आणि शिष्टमंडळाने मुंबईला जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घ्यावी, अशी मागणी करत मावळ तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी शनिवारी आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या तळेगाव येथील निवासस्थानी सकाळी बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी भाजपचे चार तालुकाध्यक्ष दत्तात्रय गुंड, मावळ विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे,मावळ विधानसभा विस्तारक रवी देशपांडे, भास्करराव म्हाळसकर, धोडिबा मराठे, गुलाबराव माळसकर ,शांताराम कदम, बाळासाहेब घोटकुले, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष नितीन मराठे, दत्तात्रय माळी उपस्थित होते.
या प्रसंगी रवींद्र भेगडे म्हणाले, निवडून येण्याची क्षमता पाहता भेगडे यांचीच उमेदवारी सर्व समावेशक आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन महाराज हे म्हणाले की, बारणेंना दोनदा खासदारकीचे तिकीट मिळवून देण्यात आणि विजयी करण्यात वाटा असलेल्यांचा आणि युतीच्या धर्माचा विसर बारण्यांना पडला आहे.
कार्यकर्त्यांना त्यांची भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सर्व जागांवर विजय मिळविणे महत्त्वाचे आहे. बाळा भेगडे, माजी राज्यमंत्री