शबनम न्युज | मुंबई
जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी आज (३ एप्रिल) अधिकृतपणे शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. पाटील यांनी शिवसेना (उबाठा गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाची मशाल हाती घेतली.
पक्षप्रवेशावेळी खासदार उन्मेश पाटील म्हणाले, महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवत, भारताला मराठी बाणा दाखवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आज मी प्रवेश करत आहे. मी भाजपा सोडून ठाकरे गटात प्रवेश करत असल्याने मला अनेकजण विचारत आहेत की, उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही नाराज आहात का? मी या सर्वांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, राजकारण करताना आमदार, खासदार होणं हे एवढंच माझं ध्येय नव्हतं. मी खूप चांगल्या हेतूने काम करत होतो. परंतु, राजकारणात काम करताना, आमदार असताना आज आपण जी शासकीय योजनांची जत्रा पाहतोय, त्याचा पॅटर्न आम्ही चाळीसगावात राबवला होता. दुर्दैवाने त्याला किंमत मिळाली नाही. मी मागणी न करता मला मागील वेळेस लोकसभा उमेदवारी मिळाली. परंतु, यावेळी मला एका भावाने दगा दिला तरी दुसरा भाऊ म्हणजे शिवसेना माझ्याबरोबर आहे आणि याचा मला आनंद आहे.