शबनम न्युज | मुंबई
लोकसभा सार्वत्रिक निवडणुका अंतर्गत मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघ अंतर्गत अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ‘रन फॉर वोट’ या मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मतदारांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
मुंबई उपनगर जिल्ह्याअंतर्गत चार लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांतर्गत स्वीपचे विशेष समन्वय अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी क्षेत्रीय अधिकारी यांना जनजागृती आणि प्रबोधन करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजनाबाबत प्रशिक्षण दिले आहे.
मुंबई- उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघांतर्गत मुंबई उपगनर जिल्ह्यातील १७०-घाटकोपर पूर्व या विधानसभा मतदारसंघातील युवकांची मतदानाबाबत जनजागृती करुन मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आज मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.