शबनम न्यूज | पुणे
पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अमोल कोल्हे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विश्वजीत कदम, योगेंद्र चव्हाण उपस्थित होते. राष्ट्रवादी ,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या बारामती, पुणे आणि शिरूर येथील उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार यादेखील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निमित्ताने महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रचार सभा होणार आहेत.
यावेळी सुळे म्हणाल्या, काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत जे-जे लोक उमेदवारी अर्ज भरतील त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत. सर्वांना मी विजयासाठी शुभेच्छा देते, सुनेत्रा पवारांचे नाव न घेता सुळेंनी शुभेच्छा दिल्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी अर्ज भरण्यास गुरुवारी (दि. १८) सुरुवात होणार झाली. त्यात जिल्ह्यातील पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर शहरात प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.