शबनम न्युज : प्रतिनिधी
पुणे : खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पुणे शहर, उपनगर आणि समाविष्ट गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याची गरज असून, समाविष्ट गावांना नियोजनपूर्वक पाणी कधी मिळणार?, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुसवसे पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केला आहे.
सुरवसे-पाटील म्हणाले की, “समाविष्ट गावातील नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. दररोज टँकरची वाट पाहावी लागत आहे. गावठाणामधील नागरिकांना अंशतः पाणी मिळत असले, तरी वाड्या-वस्त्या आणि सोसायट्यांमधील नागरिकांची पाणी समस्या गंभीर आहे. पालिका प्रशासनाने समाविष्ट गावातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी बंद नलिकेतून दिले, तर टँकरमधून पाणी गळती, पाणी भरणा केंद्रावरील पाणी गळती थांबेल, तसेच रस्त्यावर धावणाऱ्या पाण्याच्या टँकरमुळे वाहतूककोंडी, कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, वायूप्रदूषण टाळता येणे शक्य आहे. त्यासाठी प्रशासनाने भविष्याचा विचार करून पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.”
गेल्यावर्षी पावसाने ओढ दिल्याने धरणांमध्ये कमी पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या १० टीएमसी पाणीसाठा शिल्लक असला तरी, शेतीसाठीचे एक आवर्तन आहे. त्यामुळे पिण्यासाठी सहा टीएमसी पाणी उपलब्ध असणार आहे. दरवर्षी पाण्याचा साठा बघून पाणी बचतीचा निर्णय घेतला जातो. पण यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठलेही नियोजन नाही. यासाठी सत्ताधारी पक्षाचा प्रशासनावर दबाव असणार, ही बाब सत्य आहे. तरीसुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी झाल्यानंतर राज्यकर्ते पुणेकरांच्या पाण्याविषयी जो काही निर्णय असेल तो प्रशासनाने घ्यावा, अशी भूमिका घेतली. तोपर्यंत पाणीसाठ्याची स्थिती अधिक चिंताजनक होईल, याचा विचार प्रशासनाने करावा. पुणेकरांना उन्हाळ्यातही पाणी टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी सुरवसे-पाटील यांनी केली आहे.