शबनम न्यूज | पुणे
राज्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होताना दिसत आहे. दिवसेंदिवस तापमान चांगलेच वाढू लागल्याने राज्यातील नागरिक हैराण झाले आहेत. तसेच राज्यातील पुणे जिल्ह्यातील नागरिक देखील वाढत्या तापमानामुळे त्रस्त झाले आहेत. शिरूर मध्ये 43.9 आणि मगरपट्टा येते 43 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच पुढील दोन दिवसात पुण्यात उष्णतेची लाट येईल, असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.
जिल्ह्यातील 28 ऑटोमॅटिक वेदर स्टेशनपैकी सहा स्टेशनवर मंगळवारी (दि.30 ) 40 च्या आत तापमान होते आणि 22 स्टेशनवर 40 पार तापमान नोंदवले गेले. यावरून पुणे किती तापत आहे? हे स्पष्ट होत आहे.
पुणे शहरातील अनेक भागातील तापमान चाळिशीच्या वर गेले आहे. त्यामध्ये मगरपट्टा, वडगावशेरी, कोरेगाव पार्क, हडपसर, एनडीए, शिवाजीनगर, पाषाणाचा समावेश आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुण्यातच 22.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
"पुणे जिल्ह्यात उष्णतेची लाट आली असून, बुधवारीदेखील ही लाट असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणे टाळावे. डिहायड्रेड होऊ नये म्हणून सतत पाणी प्यावे. बुधवारनंतर तापमान हळूहळू कमी होईल. " - डॉ. अनुपम कश्यपी, माजी हवामानशास्त्रज्ञ