शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमध्ये बालवाडी शिक्षिकांच्या मागणीची महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दखल घेतली असून, बालवाडी शिक्षिकांच्या मानधनात वेतन श्रेणी मिळणेबाबत चे पत्र महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे दिले आहे.
मागील आठवड्यात बालवाडी शिक्षिका यांनी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे मानधन वेतन श्रेणी मिळणेबाबत मागणी केली होती. सध्याच्या कोरोना महामारी मुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून, सध्याचे बालवाडी शिक्षिका यांचे मानधन अतिशय कमी स्वरूपाचे असल्याने तसेच महापालिकेच्या सेवेपासून या बालवाडी शिक्षिका वंचित असल्याने त्यांना मानधन वाढ वेतन श्रेणी मिळावी, अशी मागणी केली होती. या मागणीची दखल महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी घेतली असून मनपा आयुक्तांना दिलेल्या पत्रात महापौर यांनी नमूद केले आहे की, महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील सर्व बालवाडी शिक्षिका या गेली पंचवीस ते तीस वर्षे कामकाज करत असून त्यासाठी त्यांना मिळणारे मानधन हे तुटपुंजे असल्याने मानधन वाढवून मिळावे, तसेच इतरही महापालिकेच्यावतीने सुविधा या बालवाडी शिक्षकांना देण्यात यावा व सदरची कारवाई तात्काळ करावी, अशा सूचना महापौरांनी पत्रान्वये मनपा आयुक्तांना दिले आहे.