शबनम न्यूज / पिंपरी
सात वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिचा मृतदेह पिंपरीतील एचए मैदानात फेकून देण्यात आला होता. 27 सप्टेंबर 2018 रोजी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर खचलेल्या आई-वडिलांनी जगाचा निरोप घेतला.
याप्रकरणी पोलिसांनी तब्बल तीन वर्षांनी या नराधमांच्या मुसक्या आवळल्या. राजकुमार उर्फ प्यारेलाल चंद्रकांत यादव असे त्याचे नाव आहे. हा उत्तर प्रदेशातील राहणारा आहे. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील एचए मैदानातील झुडपात 7 वर्षाच्या चिमुरडीचा अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. पोलिसांना मृतदेह शेजारी गर्भनिरोधक मिळून आले. त्यामुळे घटनेचे गांभीर्य वाढले. तपासी पथकांनी शहराच्या मुख्य चौकातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत, काही तासाच्या आत आरोपी राजकुमार याचे नाव निष्पन्न केले होते. मात्र, पोलिस आपल्या मागावर असल्याची चाहूल लागताच तो फरार झाला.
दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलिस त्याच्या मागावर होते. गतवर्षी आरोपीच्या वडिलांचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच पोलिस साध्या वेशात अंत्यविधीला पोहोचले. मात्र, त्यावेळी देखील तो आला नाही. या घटनेबाबत पोलिसांवर दबाव वाढत होता. अनेक सामाजिक संघटना राजकीय नेतेमंडळींनी यात लक्ष घातले होते. दरम्यान गुन्हे शाखा युनिट 2 च्या टीमने आरोपीच्या गावातील नागरिकांना घटनेचे गांभीर्य पटवून दिले. गावातील दोघांना नवीन मोबाईल देत खबरी नेटवर्क स्ट्रॉंग केले. मात्र, तरीही आरोपीची माहिती पोलिसांना मिळत नव्हती. दरम्यान, नऊ जुलै 2019 रोजी आरोपी आपल्या बायकोला भेटायला गावात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी पकडताच आरोपीने बेशुद्ध पडण्याचे नाटक केले. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने दारुच्या नशेत हे कृत्य केल्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शैलेश गायकवाड, उपनिरीक्षक चंद्रकुमार कदम, पोलीस कर्मचारी नामदेव राऊत, दिलीप चौधरी, केराप्पा माने, शिवानंद स्वामी, प्रमोद वेताळ, दिपक खरात, उषा दळे, जयवंत राऊत यांच्या पथकाने केली.