शबनम न्यूज | दिल्ली (दि.०१ डिसेंबर) :- दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळं जगभरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भारत सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला असून 15 डिसेंबरपासून नियमित आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय आता लांबणीवर टाकण्यात आला आहे. नवी तारीख कळेपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर स्थगिती कायम राहणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे .
ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही तातडीने पावलं उचलायला सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद ठेवावी की ठेवू नये यावर केंद्र सरकार विचार करत आहे. तसेच ज्या देशांमध्ये या नव्या विषाणूचा फैलाव झाला आहे. त्या देशांची यादीही केंद्र सरकारने जारी केली आहे.त्यात दक्षिण आफ्रिका, चीन, बोस्तवाना, यूके, ब्राझिल, इस्रायल, बांग्लादेश, मॉरिशस, न्यूझीलंड, जिम्बाब्वे, सिंगापूर आणि हाँगकाँगचाही समावेश आहे.