शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड| प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी स्वप्निल दादाराव कांबळे यांची बहुमताने निवड झाली. रविवार दिनांक 10 ऑक्टोबर 2021 रोजी पिंपरी येथे रिपब्लिकन पक्षाचा सक्रिय सदस्यांच्या मतदानातून स्वप्निल कांबळे हे विजयी झाले आहेत.
राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार, लोकशाही पद्धतीने शहराध्यक्ष पदाची निवडणूक व्हावी, असे आयोजन होते. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 2155 क्रियाशील सदस्य झाले. रिपब्लिकन पक्षाच्या घटनेनुसार, क्रियाशील सदस्य शहराध्यक्षाला मतदान करू शकतो. एक क्रियाशील सदस्य तेव्हाच होतो जेव्हा तो 50 साधे सभासद करतो. त्यानुसार निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. नवनिर्वाचित शहराध्यक्ष यांच्याबरोबर नवीन शहर कार्यकारिणी तयार होणार आहे. विधानसभा मतदारसंघ कार्यकारणी जाहीर होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रश्न, झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, महापालिका हॉस्पिटल मध्ये चालू असलेले ठेकेदारी पद्धत, खासगीकरण, नोकर भरतीचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, स्वच्छतेचा प्रश्न इत्यादी प्रश्नांवर नवीन कार्यकारिणी काम करेल, येणाऱ्या 2022 च्या मनपा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न करेल, असे मत यावेळी स्वप्निल कांबळे यांनी व्यक्त केले.