शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
भोसरी परिसरात सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी योग्य ते उपाय योजना कराव्यात, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक रवी लांडगे यांनी मुख्य कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग कंपनी मर्यादित भोसरी विभाग यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, भोसरी प्रभाग क्रमांक 6 मधील चक्रपानी वसाहत, राम मंदिर परिसर, शिव शंकर नगर, देवकर वस्ती, महादेव नगर, शंभुराजे कॉलनी व इतर सर्व चक्रपाणि परिसरातील भागात वीज पुरवठा खंडित होत आहे. आपल्या परिसराचे कार्यक्षम नगरसेवक रवि लांडगे यांनी 29 मार्च 2017, 9 एप्रिल 2021 आणि 4 ऑगस्ट 2021 रोजी वेळोवेळी या विविध समस्यांच्या निराकरणासाठी एम एस ई बी च्या मुख्य कार्यकारी अभियंता, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नवारे साहेब यांना स्वतः भेटून लेखी निवेदन दिले आहेत.
बऱ्याच वेळा त्याचा पाठपुरावा देखील केला आहे तरी काहीएक परिणाम संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर झालेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये महावितरणच्या एकूणच कारभाराविषयी संतापाची लाट आहे. नागरिकांच्या या संतापाची आणि होणाऱ्या परिणामांची वेळीच दखल घेतली नाही तर भविष्यात हा विषय महावितरणची डोकेदुखी होऊ शकतो. ही गोष्ट प्रकर्षाने निदर्शनास आणून देत आहे. दिवसेंदिवस होणारा खंडित वीज पुरवठाही स्मार्ट सिटी साठी शरमेची व खेदाची बाब आहे. सध्या असलेल्या ट्रान्सफॉर्मर वर भरपूर लोड असल्याने सतत वीज पुरवठा खंडित होत आहे. तसेच परिसरातील सर्व डीपी, बॉक्स जुने झालेले असून त्यांची अवस्था खूपच वाईट आहे. तरी आपण वरील सर्व बाबींचा लवकरात लवकर आणि गांभीर्याने विचार करून लगेचच योग्य ती कारवाई करावी, त्याचप्रमाणे ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी व त्याची क्षमता वाढविण्यासाठी डीपीडीसी योजनेअंतर्गत आवश्यक ती कारवाई करावी, असेही सदर निवेदनात नगरसेवक रवि लांडगे यांनी नमूद केले आहे.