शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२६ नोव्हेंबर ) :- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत पिंपळे गुरव / पिंपळे सौदागर परिसरात सुरु असलेल्या एबीडी (ABD) प्रकल्पामध्ये सोलर पॉवर जनरेशन, बायसिकल शेअरिंग, म्युनिसिपल ई-क्लासरुम, स्मार्ट रोड (फुटपाथसह), सायकल जंक्शन डिझाईन, स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज, सेव्हर नेटवर्क, टु पार्क अँड पब्लीक टॉयलेटस (स्ट्रीट टॉयलेट सह) या प्रकल्पांचा समावेश असून अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत पिंपळे गुरव / पिंपळे सौदागर परिसरात (Area Based Development) च्या माध्यमातून २१ कि.मी. अंतराचे रस्ते विकसीत करण्यात येणार आहे. यामध्ये, पिंपळे गुरव परिसरात ८.४९ कि.मी. तर पिंपळे सौदागर परिसरात १३.३३ कि.मी. रस्ते विकास कामांचा समावेश आहे. पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर या दोन्ही भागांमध्ये २१ कि.मी. अंतरात एकुण फुटपाथसह ४२ रस्त्यांचा समावेश आहे. यापैकी ३५ रस्ते स्मार्ट सिटीच्या ताब्यात मिळाले असून ३१ रस्त्यांचे कामे सूरू आहेत. तर ७ रस्ते ताब्यात येणे बाकी आहे.
सदर रस्ते विकास कामांमध्ये ४२ रस्त्यांची निवड करण्यात आलेली होती. परंतु, स्थानिक अडचणींमुळे पिंपळे सौदागर येथील २ रस्ते रदद करण्यात आलेले असून ४० रस्त्यांचे विकास कामे सद्या सुरु आहेत. तर, ३ रस्ते विना फुटपाथ आहेत. तसेच, जिजामाता उद्यानाचे काम पूर्ण झालेले आहे. देवकर पार्क ते जुनी सांगवी एसटीपी पर्यंत नदीपात्रातून २९५० मीटर पैकी २८५० मीटर (River Interceptor) काम पुर्ण झालेले आहे. पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर याठिकाणी एकूण १० स्मार्ट टॉयलेट उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी दोन्ही ठिकाणी ४ स्मार्ट टॉयलेटचे काम प्रगतीपथावर असून संपूर्ण १० ठिकाणी नोव्हेंबर २०२१ पर्यंत काम पूर्ण करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी आराखडयानुसार पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव या भागात एकुण ४९ बस स्टॉप उभारण्यात येणार असून सद्यस्थितीत एकूण ९ स्मार्ट बस स्टॉपचे काम प्रगती पथावर असून मार्च २०२२ पर्यंत संपूर्ण स्मार्ट बस स्टॉपचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तर, योगा पार्क मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होईल. यासह स्मार्ट रस्त्यांना जोडणा-या ४१ जंक्शन चे काम पूर्ण करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर, स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज सेव्हरेज लाईन आणि वॉटर सप्लाय लाईन, रस्त्यांच्या कडेला इलेक्ट्रीक पोल, रस्त्यांच्या कडेला विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड, रस्त्यांच्या कडेला लहान गार्डन, उद्यानांचा विकास, पार्किंग सुविधा आदी कामांचा या प्रकल्पात समावेश आहे.
आगामी काळातील उत्पन्नाचे स्त्रोत :–
व्हीएमडी (VMD) :- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे अनेक प्रकल्प पूर्णत्वावर तर काही प्रकल्प प्रगती पथावर असून भविष्यात उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून हे प्रकल्प महत्वाचे ठरणारे आहे. सध्या पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीला शहराला बसविण्यात आलेल्या ५५ पैकी २० Variable Message Display (VMD) च्या माध्यमातून र.रु. २,४०,०००/- इतके उत्पन्न मिळाले आहे. भविष्यात जाहिरातींच्या माध्यमातून मोठे उत्पन्न या VMD द्वारे मिळेल असा विश्वास आहे.
स्मार्ट किओक्स Kioks : एटीएम सारखेच असणारे स्मार्ट किऑस्क हे भविष्यात शहरातील नागरिकांसाठी माहितीच्या डिजिटल स्वरूपातील आदान प्रदानाचे केंद्र मानले जाणार आहे. शहरात ५५ स्मार्ट किओक्स बसवून ते कार्यरत करण्यात आलेले आहेत. यामध्ये, कार्ड रिचार्ज, मोबिलिटी तिकेटींग, इन्फॉरमेटीव्ह अँड ट्रांजॅक्शनल सर्व्हिसेस अशा ३५ ते ४० नागरी सुविधा देण्यात आलेल्या आहेत. ऑनलाईन मिळकत कर भरणा, पाणी पट्टी भरणा यासारख्या २८ सेवांचा लाभ घेता येणार असून पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण सुविधा कार्यरत होवून पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
सिटी नेटवर्क City network भविष्यातील उत्पन्नाचा स्त्रोत : – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत शहरामध्ये एकूण ५८५ किमी अंतराचे Optical fiber Network चे जाळे टाकण्यात येत आहे. भविष्यात हा प्रकल्प स्मार्ट सिटी व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यासाठी उत्पन्नाचे साधन होणार आहे. यापुढे शहरात खासगी कंपन्यांना केबल टाकण्यास मनाई करून सिटी नेटवर्कच्या माध्यमातून सदर कंपन्यांची यंत्रंणा जोडली जाणार आहे. नागरिकांना होणार रस्ते खोदाईच्या त्रास कमी होवून महापालिकेच्या अनावश्यक खर्चास आळा बसणार आहे.
मर्चंड मॉडयुल ॲप:– केंद्र शासनाच्या ‘व्होकल फॉर लोकल’ या धोरणाला अनुसरून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शहराच्या विकासाला चालना मिळावी आणि व्यापारी व ग्राहक यांच्या दरम्यान दुवा साधला जावा, यासाठी पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅपमध्ये मर्चंट मोड्यूलची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना ऑनलाईन खरेदीची सुविधा उपलब्ध होऊन सवलतींचा लाभ मिळेल तसेच व्यापारी वर्गाला देखील व्यवसायवृद्धीसाठी याचा उपयोग होईल. अॅपमुळे व्यापाऱ्यांनी जाहीर केलेल्या योजना ग्राहकांपर्यंत तात्काळ पोहोचतील. जाहिरात, व्यापारी वर्गाचे रजिस्ट्रेशन आणि विविध आर्थिक व्यवहारांवरील शुल्क या माध्यमातून पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीला उत्पन्न प्राप्त् होणार आहे, असेही महानगरपालिका आयुक्त् तथा स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी माहिती देताना सांगितले.