शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२० डिसेंबर) :- पिंपरी चिंचवड स्टार्ट-अप आणि इनक्युबेशन सेंटर (पीसीएसआयसी) दोन वर्षे यशस्वी प्रवास करून आता तिसऱ्या वर्षात प्रवेश करीत आहे. पीसीएसआयसीच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त ” पीसीएसआयसी स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह २०२१” या एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. शहरातील नविन स्टार्टअपला जागतिक स्तरावर एक व्यासपीठ मिळवून देणे हे पिंपरी चिंचवड स्टार्ट-अप आणि इनक्युबेशन सेंटरचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यानुषंगाने “PCSIC स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह” या एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
बुधवार, २२ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०:०० वाजता, पिंपरी चिंचवड स्टार्ट-अप आणि इनक्युबेशन सेंटर कार्यालय, ऑटो क्लस्टर, चिंचवड, पुणे याठिकाणी कार्यक्रम घेण्यात येणार असून कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पिंपरी चिंचवड महापालिका महापौर मा. श्रीम. सौ. उषा उर्फ माई ढोरे, मा. आयुक्त श्री. राजेश पाटील, तर प्रमुख पाहूणे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि एग्रीकल्चरचे अध्यक्ष मा. श्री. सुधीर मेहता, तसेच सिम्बॉयसीस युनिर्व्हसीटीच्या प्रो कुलगरु डॉ. स्वाती मुजूमदार, इन्क्युबेशन सेंटरचे मॅनेजिंग डायरेक्टर किरण वैद्य यांच्यासह पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे मान्यवर संचालक, पिंपरी चिंचवड स्टार्ट-अप आणि इनक्युबेशन सेंटर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमामध्ये महिला उद्योजकता व त्यांना उपलब्ध संधी, महिला उद्योजकता वाढीसाठी एकसंध परिसंस्था निर्माण करणे, यशस्वी महिलांच्या यशोगाथा, कोविड 19 नंतरच्या परिस्थितीवर गुंतवणूकदारांचा दृष्टीकोन, स्टार्ट-अप साठी संभाव्य निधी उभारणीसाठी गुंतवणूकदारांसोबतची चर्चा, आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने १४ नोव्हेंबर २०१९ रोजी नवउद्योजक आणि स्टार्ट अप्स यांना चालना देण्यासाठी इनक्युबेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. ऑटोमोटीव्ह इंजिनिअरींग, बायो फार्मा, माहिती तंत्रज्ञान, सेवा क्षेत्र या क्षेत्रांमध्ये नवनिर्मिती, सहयोग आणि उद्योजकता यांना प्रोत्साहन देणे हे इनक्युबेशन सेंटरचे मुख्य उददीष्टये आहेत. पिंपरी चिंचवड स्टार्ट-अप आणि इनक्युबेशन सेंटरमध्ये जानेवारी २०२० पासून ८ स्टार्टअप कार्यरत होते. माहे. फेब्रुवारी २०२० मध्ये “फेस्टिव्हल ऑफ फ्युचर २०२०” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाद्वारे १५ फेब्रुवारी २०२१ पासून १७ नवीन स्टार्टअप्स कार्यरत आहेत. पिंपरी चिंचवड स्टार्ट-अप आणि इनक्युबेशन सेंटरकडे आता १२ मार्गदर्शकांची टीम असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण २५ स्टार्टअप सक्रियपणे कार्यरत आहेत.
पिंपरी चिंचवड स्टार्ट-अप आणि इनक्युबेशन सेंटरने “इनोफेस्ट २०२१” पासून ५ स्टार्टअप घेतलेले आहेत. इनक्यूबेट्स तसेच स्टार्टअप्समध्ये आवश्यक ज्ञानासह पिंपरी चिंचवड मनपा आणि पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात आतापर्यंत एकूण १३ सत्रे घेण्यात आलेली आहेत. तसेच, १७ ऑगस्ट २०२१ पासून PCSIC नव उद्योजकांसाठी कॅप्सूल कोर्स सुरू करण्यात आलेला असून हा ६ आठवड्यांचा कोर्स (विनामूल्य) दर मंगळवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत घेण्यात येत आहे. यामध्ये एकूण १८०+ पीसीएमसी स्टार्टअप्सनी सहभाग घेतला आहे. आझादी का अमृत महोत्सवा निमीत्त् “स्पीच फेअर”चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मुंबईतील गुंतवणूकदारांना आमंत्रित करून २५ स्टार्टअपला सादरीकरणाची संधी देण्यात आली होती. स्टार्ट-अप आणि इनक्युबेशन सेंटर आणि पिंपरी चिंचवड महापालिका स्टार्टअप डिरेक्टरीसाठी देखील नियोजन करीत असून ५० हुन अधिक स्टार्टअप डेटा गोळा करण्याचे उददीष्टये ठेवण्यात आले असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा स्टार्ट-अप आणि इनक्युबेशन सेंटरचे चेअरमन श्री. राजेश पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.