प्राधिकरणातील ज्येष्ठ नागरिक संघाकडून पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या जेष्ठांचा सन्मान
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२८ मार्च) :- कोणत्याही क्षेत्रात ज्येष्ठांच्या अनूभवी मार्गदर्शनाशिवाय यशस्वी वाटचाल करणे शक्य नाही. ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात मला वारंवार येण्याचा योग येतो हे माझे भाग्य आहे. येथे आनंदासह काम करण्याची नवी ऊर्जा मिळते. ज्येष्ठांचे विचार आणि सूचना या अमुल्य असून त्या विचारात घेतल्या पाहिजेत. समाजानेही त्यांना योग्य वागणून दिली पाहिजे; त्यांच्या सूचनांची दखल घेतली पाहिजे. ज्येष्ठांचा आजचा अमृत महोत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांनी आजवर विविध क्षेत्रात दिलेल्या सेवाचा सन्मान होय, असे प्रतिपादन माजी उपमहापौर शैलजाताई मोरे यांनी केले.
भारताच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्राधिकरणातील जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने रविवारी (दि. २७) रोजी प्राधिकरणातील वाढोकर सभाग्रहात वयाची ७४ वी पूर्ण करून पंच्याहत्तरीत पदार्पण केलेल्या तब्बल १९३ जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आर. एस. कुमार, सलीम शिकलगार, सचिन कुलकर्णी, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष जोशी ,प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ कार्यकारणी सदस्य व मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.तसेच भाजयुमो चे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे यांनी ही ज्येष्ठांना शुभेच्छा दिल्या.
पुढे बोलताना शैलजाताई म्हणाल्या, कामाच्या व्यस्ततेत जगत असतांना कलागुण लुप्त होतात. मात्र, निवृत्तीनंतर कलागुणांना पून्हा पुनर्जीवित करण्याचे काम ज्येष्ठ नागरिक संघ करत आहे. ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित या अमृत महोत्सवात ज्येष्ठांच्या कार्याचा सन्मान करून त्यांना पाठबळ दिले. सलोखा व ऐक्य टिकवत समाजाची ओळख अबाधित ठेवण्याचे काम प्राधिकरणातील ज्येष्ठ नागरिक संघाकडून होत आहे. त्यांच्या चांगल्या समाज निर्मितीच्या दिशेने होणारे काम कौतुकास्पद आहे. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष जोशी सूत्र संचालन सौ ज्योती इंगोले व आभार अर्चना वर्टिकर यांनी केले.