शबनम न्यूज : पुणे (दि.१९ एप्रिल) :- डॉ. लतिफ मगदूम स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रीय मुस्लीम मंचचे मार्गदर्शक डॉ. इंद्रेशकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. लतिफ मगदूम यांच्या प्रथम स्मृतीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम बुधवार दि. २० एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत पद्ममजी हॉल, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, टिळक रस्ता-स्वारगेट येथे होणार आहे.
डॉ. इंद्रेशकुमार हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. अध्यक्षस्थानी अभिनव एज्युकेशन सोसायटी (पुणे) चे अध्यक्ष राजीव जगताप आहेत, अशी माहिती डॉ. लतिफ मगदूम स्मृती प्रतिष्ठानच्या संस्थापिका अध्यक्ष अँड. सरोजिनी लतिफ मगदूम आणि सचिव माया प्रभुणे यांनी पत्रकाद्वारे दिली .
डॉ. लतिफ मगदूम यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. कार्यक्रमादरम्यान रोजा इफ्तार चे आयोजन करण्यात आले आहे.प्रतिष्ठानतर्फे शांतीवन वृद्धाश्रमाला ११ हजार,बाल अनाथगृह(घोडेगाव) ला ११ हजार,दहावी परीक्षेत ९९ टक्के गुण मिळविणाऱ्या १४ विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रत्येकी १ हजार रुपये या कार्यक्रमात दिले जाणार आहेत.
डॉ. लतीफ मगदूम हे महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे सचिव होते. तरुण वयात युवक काँग्रेसच्या चळवळीत असलेल्या मगदूम यांचा पुण्यातील हिराबाग गणेश मंडळ, सामाजिक संस्थांशी घनिष्ट संबंध होता. राष्ट्रीय मुस्लीम मंचाचे प्रदेश समन्वयक म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘ लतीफभाई मगदूम स्मृती प्रतिष्ठान ‘ ची स्थापना करण्यात आली आहे.