शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील दत्तनगर, विद्यानगर या प्रभाग १० मध्ये पालिकेच्या अधिकारी आणि ठेकेदारांनी निर्दयपणे झाले तोडली आहे. मंगळवार (दि. १५) रोजी चक्क रात्री नऊच्या सुमारास हा निंदणीय प्रकार घडला. दरम्यान, इतक्या रात्री उशिरा बेसुमार झाडे तोडण्याची काय गरज होती? या भागात झोपडपट्टी आहे, म्हणून येथे कोणी वाली नाही का, असा सवाल भाजपचे नेते अमित गोरखे यांनी उपस्थित केला आहे.
ते म्हणाले, पर्यावरण संवर्धन ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र पालिकेतली जबाबदार मंडळीच जर असं बेजबाबदारपणे वागायला लागली तर काय म्हणावं? पर्यावरण वाचवा, असा संदेश सरकारी पातळीवरुन दिला जातोय. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असताना या बेजबाबदारपणाबद्दल संबंधितांना कोणीच जाब विचारणार नाही का?
याप्रकरणी पालिकेच्या अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांविरुध्द कठोर कारवाई करण्यात यावी कारण एवढी झाडे तोडणं म्हणजे पर्यावरणाचा खूप मोठा र्हास करणं आहे, असंही अमित गोरखे यांनी म्हटलंय. दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये वुड माफिया आहे आणि तो कुणालाही जुमानत नाही, हे वारंवार आम्ही पर्यावरण क्षेत्रात कार्यरत लोकांनी सांगितलेलं आहे. त्याचाच हा आजचा अजून एक कटू अनुभव आहे.
आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन संबंधितांविरुध्द त्वरित कडक कारवाई करावी, अशी मागणी सर्व संस्थांच्यावतीनं करीत आहोत, अशी माहिती धनंजय शेडबाळे (स्मार्ट सिटी एनजीओ सदस्य) यांनी दिली आहे.