शबनम न्युज | पुणे
मुलाला जन्म नाही देऊ शकत याकारणाने एका विधीचा भाग म्हणून एका महिलेला पती आणि सासरच्या लोकांनी मानवी हाडांची पावडर खाण्यास भाग पाडले, याप्रकरणी २८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून, सासरच्या लोकांवर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात आरोपींवर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६/२, ३४ आणि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन अँड इरेडिकेशन ऑफ ह्युमन सॅक्रिफिस आणि इतर अमानवी, या कलमांखाली गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या संगणक अभियंता आहेत. एप्रिल २०१९ मध्ये तिचे लग्न झाले,तेव्हापासून आरोपीने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला आणि तिच्या वडिलांकडे पैसे व इतर गोष्टींची मागणी केली. कोविड-१९ साथीच्या काळात झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे आणि तक्रारदार मुलाला जन्म देत नसल्यामुळे, आरोपीने प्रत्येक “अमावस्या”ला काही विधी केली. असा प्रकार अनेक वेळा आरोपींनी केला असल्याचे फिर्यादीने सांगितले. फेब्रुवारी २०११ मध्ये अशा विधी दरम्यान, आरोपींनी नातेवाईकाच्या ठिकाणी पूजा केली होती ज्यासाठी त्यांनी काही मानवी हाडे आणि इतर वस्तू आणल्याचा आरोप आहे. त्यांनी हाडे ठेचून पावडर केली आणि महिलेला ते सेवन करण्यास सांगितले. तिने नकार दिल्यावर त्यातील एकाने तिच्याकडे रिव्हॉल्व्हर दाखवून तिला हे पदार्थ खाण्यास भाग पाडले. याबाबत फिर्यादींनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली असून या घटनेचा अधिक तपास सिंहगड रोड पोलिस करीत आहे.