भाजप राष्ट्रवादी शिवसेनेकडून अद्याप कोणताही उमेदवार जाहीर नाही
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
चिंचवड विधानसभेचे स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर विधानसभेची जागा रिक्त झाली आहे, या रिक्त जागे करीता येत्या 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आज 31 जानेवारीपासून सुरू होत आहे. 7 फेब्रुवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचा आहे.
भारतीय जनता पार्टी वतीने जगताप कुटुंबीयातील व्यक्तींना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु उमेदवारी कोणाला? हे अजून स्पष्ट झाले नाही. स्व. लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर शेठ जगताप की, स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनीताई जगताप यांना उमेदवारी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु अद्याप पक्षाच्या वतीने अधिकृत जाहीर करण्यात आले नाही.
राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविण्यासाठी पक्षाचे माजी नगरसेवक नाना काटे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर हे तीव्र इच्छुक आहेत. समाज माध्यमात त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी म्हणून या दोन्ही नेत्यांची नावे प्रामुख्याने पुढे येत आहेत. कालच राष्ट्रवादी पक्षाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत शहराध्यक्ष अजित गव्हाणे तसेच मावळचे आमदार सुनील शेळके, माजी नगरसेवक नाना काटे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, युवकचेअध्यक्ष इम्रान शेख, महिला अध्यक्ष कविता आल्हाट यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी पक्ष पूर्ण शक्तीने लढणार असल्याचे एक सुरात ठरविण्यात आले.
शिवसेना पक्षाच्या वतीने माजी नगरसेवक राहुल कलाटे हे तीव्र इच्छुक आहेत. त्यांनी मागील 2019 च्या निवडणुकीत स्व.लक्ष्मण जगताप यांचे विरोधात 1 लाख 12 हजार मते मिळविली होती व ते दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले होते. यावेळीही राहुल कलाटे ही पोटनिवडणूक लढविण्यास तयार असून शिवसेना पक्षाच्या वतीने हे तीव्र इच्छुक आहेत.
चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी, अशी आशा भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या वतीने वेळोवेळी व्यक्त करण्यात आली आहे. याकरिता त्यांनी शहरातील प्रमुख पक्षाचे शहराध्यक्ष यांना सदर निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता पत्रही पाठविले आहे .पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सदर निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता आपण प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे आणि आमची विनंती जर मान्य झाली नाही आणि निवडणूक झाली तरी आम्ही मोठ्या फरकाने जिंकून येऊ, असाही विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
आज पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे सदर निवडणूक होते की बिनविरोध आमदार निवडला जातो हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणूक होणार असल्याचे संकेत अलीकडेच दिले. त्यामुळे आता चिंचवड विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणुकीत अनेक घटना घडणार आहेत. यात शंका नाही, चुरशीची लढत पाहावयास मिळते की निवडणूक बिनविरोध होते. हे आत्ताच काही सांगता येणार नाही.