शबनम न्यूज पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
पिंपरी, ता. २ : हवेली आणि तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात खुनासह इतर सात गुन्हे दाखल असलेल्या मोका गुन्ह्यातील फरार आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या गुंडा विरोधी पथकाने अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथून बुधवारी ताब्यात घेतले.
अमर अशोक चव्हाण (वय ३२, तळेगाव दाभाडे) याचा मोबाईल नंबर प्राप्त करून या नंबरचे तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी हा शिर्डी येथे वास्तव्यास असल्याबाबत माहिती तळेगाव दाभाडे येथील गुंडा विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार सहायक पोलिस उपनिरीक्षक हजरत पठाण, प्रवीण तापकीर, गणेश मेदगे, सोपान ठोकळ, शुभम कदम यांच्या पथकाने शिर्डी येथे जाऊन परिसरात शोध घेत चव्हाण यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कार्यवाहीसाठी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती गुंडाविरोधी पथक, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने यांनी दिली.