शबनम न्युज | मुंबई
आज मुंबईत अभिनेते तसेच काँग्रेसचे माजी नेते गोविंदा यांनी शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच पत्रकारांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला. याप्रसंगी विधानसभेच्या उपसभापती नीलिमा गोर्हे, मंत्री दादा भुसे तसेच शिंदे गटाचे नेते उपस्थित होते.
गोविंदा यांनी यावेळी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, मुंबई सुंदर होत आहे आणि याचे श्रेय एकनाथ शिंदे यांना जाते. एकनाथ शिंदे जेव्हापासून मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले, तेव्हापासून मुंबईमध्ये अनेक विकास कामे झाली आहे. त्यांच्या विकासाच्या कामामुळे प्रभावित झाल्याने मी आज शिवसेनेत प्रवेश करत आहे. मला दिलेली जबाबदारी मी इमानदारीने पार पाडेल, असेही गोविंदा यांनी यावेळी सांगितले.
अभिनेता गोविंदा यांनी 14 वर्षानंतर राजकारणात पुन्हा प्रवेश केला आहे. 2004 ते 2009 या काळात गोविंदा काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून राजकारणात सक्रिय होते. 2010 मध्ये त्यांनी राजकारण सोडले व पुन्हा चित्रपटात सक्रिय झाले. परंतु ,आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोविंदा यांनी प्रवेश करून परत राजकारणात सक्रिय झाले आहेत.