मी चांगल्या मताधिक्याने विजयी होणार – सुनेत्रा पवार
शबनम न्युज | पुणे
“मी एकटी नाही, बारामती माझं कुटुंब आहे. बारामतीकर माझं कुटुंब असणार आहे, त्यामुळे मी कुठेही एकटी नाहीये,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी तसेच बारामती मतदारसंघ निवडणुकीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी केले. ते आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून खासदार सुप्रिया सुळे आहेत. आता बारामती मतदारसंघात मतदार कोणाला निवडून देतील, हे पाहणे उत्सुकाचे ठरणार आहे.
यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, मी मतदार संघात फिरते, मला खात्री आहे की, चांगल्या लीडने मी विजयी होणार. गेल्या पंचवीस वर्षापासून मी समाजकार्यात कार्य करत आहे. भोरमधील एमआयडीसी आणि पुरंदर मधील विमानतळाचा विषय देखील मी मार्गी लावणार तसेच अजित पवारांनी विकासाच्या मुद्द्यावर भूमिका घेतली आहे. मोदींच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या निर्णयावर मीही ठाम आहे. मतदारांची भाषा मला नक्की समजते, त्यामुळे मतदारांचे प्रश्न मी संसदेत नक्कीच मांडणार, असे प्रत्युत्तर सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांना दिले आहे.
तसेच निवडणुका या तेवढ्यापुरत्या असतात, मात्र निवडणुका संपल्यावर संबंध सुधारू शकतात, असे आश्वासन सुनेत्रा पवार यांनी दिली आहे.