शबनम न्युज | पुणे
महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून उद्या म्हणजेच गुरुवार (दि. 18 एप्रिल) रोजी तीन उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूर चे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर हे तीन उमेदवार उद्या आपले अर्ज दाखल करून यावेळी शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असून शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांची सभा होणार आहे.
उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता तिघेही उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर रास्ता पेठ येथील हॉटेल शांताई समोर महाविकास आघाडीची सभा होणार आहे,अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.
या सभेनिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ,काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजित फाटके सभेला मार्गदर्शन करणार आहेत .तसेच यामध्ये विशेष म्हणजे बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार देखील गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.