शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी, सांगवी परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, या उन्हाळ्याच्या दिवसात तापमान 40°c तापमानाच्या वर जात आहे, अशा परिस्थितीत नवी सांगवी, सांगवीमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरामधील फॅन, कुलर, एसी या विद्युत साधनांचा वापर वीजपुरवठा होत नसल्याने करता येत नाही ,त्यामुळे नागरिकांना घरात राहणे अवघड झाले आहे. नवी सांगवी, सांगवी परिसरातील नागरिक वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने संतप्त झाले आहेत, या परिसरातील माजी नगरसेवक हर्षल ढोरे यांनी सांगवी गावातील वीज पुरवठा सुरळीत व्हावा, याकरिता नवी सांगवी, सांगवी परिसरातील महावितरण विभागाला निवेदन दिले ,या निवेदनात नवी सांगवी, सांगवी मधील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी हर्षल ढोरे यांनी केली आहे. तसेच नागरिकांच्या वतीने वारंवार महावितरण विभागाला तक्रार देऊनही वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, त्यामुळे यापुढे जर दोन दिवसात नवी सांगवी, सांगवी परिसरातील वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक हर्षल ढोरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
यापूर्वी नवी सांगवी, सांगवी परिसरामध्ये कोरोना काळात असाच विजेचा लपंडाव सुरू होता. त्यावेळीही महावितरण विभागा वतीने उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली होती. त्या काळात माजी नगरसेवक हर्षल ढोरे यांनी महावितरण विभागाच्या कार्यालयाची तोडफोड करून अधिकाऱ्यांना इशारा दिला होता. त्यावेळेस महावितरण विभागाच्या वतीने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला परंतु आता या उन्हाळ्याच्या दिवसात परत वीज खंडित होणे वारंवार सुरू झाल्याने सांगवी परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. बऱ्याच सोसायटी धारकांना तसेच रहिवाशांना वीज पुरवठा खंडित होत असल्याने पाणी मिळणे ही कठीण झाले आहे.ऐन पाणी सुरू होण्या च्या वेळेसच वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाण्याची मोटर सुरू करता येत नसल्याने साधे पाणीही नागरिकांना मिळणे कठीण झाले आहे. यामुळे माजी नगरसेवक हर्षल ढोरे यांनी परत एकदा महावितरण विभागाला निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे. दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा आंदोलनाला सामोरे जा, असा तीव्र इशारा हर्षल ढोरे यांनी महावितरण विभागाला दिला.