शबनम न्युज / पिंपरी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या माध्यमातून हा देश लोकशाही राष्ट्र झाला. ही लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आणि लोककल्याणासाठी संविधानाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या पुस्तकांचे वाचन आणि विचारांचे आदान प्रदान करून घरी राहूनच साजरी करावी असे आवाहन पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधनपर्वाचे आयोजन दि.११ ते १४ एप्रिल २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आज नागरिकांशी थेट संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमावेळी विचार प्रबोधन पर्वाचे संयोजक तथा समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले आणि जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड उपस्थित होते.
फुले शाहू आंबेडकरांनी समतावादी पुरोगामी विचार दिले. या विचारांचे आचरण प्रत्येकाने केले पाहिजे. उपेक्षितांच्या न्याय हक्कासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला लढा आणि जीवन संघर्षातून दिलेली शिकवण आजही प्रेरणादायी आहे. बाबासाहेबांनी शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र दिला. त्यामुळे आपण शिक्षणावर अधिक भर दिला पाहिजे. या शिक्षणाचा वापर समाजाच्या प्रगतीसाठी करणे गरजेचे आहे. संघर्ष हा चांगला असेल तर तो आपल्याला आनंद देणारा ठरतो परंतु आपल्याच गैर वर्तनामुळे आपल्याला त्रासही होतो. त्यामुळे प्रज्ञा शील करुणा आणि बाबासाहेबांनी दिलेल्या धम्मानुसार आपले आचरण असल्यास ती निश्चितच चांगली गोष्ट ठरणार आहे. पिळवणूक ही केवळ बाहेरचे लोक करतात असे नव्हे तर आपण स्वतः देखील स्वतःची पिळवणूक आपल्यातील गैरवर्तनामुळे करत असतो. त्यामुळे आपण चांगले आचरण ठेवून मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. धम्मातील पंचशिल तत्वाचा अंगीकार जीवनात महत्त्वाचा असून बाबासाहेबांनी दिलेल्या सिद्धांतांचे पालन करणे गरजेचे आहे. सध्या कोरोनाचा प्रसार वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने सर्वांसाठी काही नियम घालून दिले आहेत, त्याचे पालन करून यावर्षी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती प्रत्येकाने घरी साजरी करावी असे आवाहन आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले तर आभार समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी मानले.
दरम्यान, विचार प्रबोधन पर्वाच्या दुसऱ्या दिवशी विविध कलाकारांनी गीत गायनाच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांना उजाळा दिला. शाहीर अशोक निकाळजे गायक स्वप्निल पवार राहुल साठे आणि सहकाऱ्यांनी भीम गीतांचा कार्यक्रम सादर केला. अजय देहाडे आणि सहकाऱ्यांनी तुफानातले दिवे हा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केला. महाकवी वामनदादा कर्डक, प्रतापसिंग बोदडे यांनी लिहिलेल्या गीतांचे सादरीकरण देखील या कार्यक्रमात करण्यात आले.
तिसऱ्या दिवशीच्या सकाळ सत्रात सागर यल्लाळे आणि निवृत्ती ओव्हाळ यांच्या भीम गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला तर नाशिक येथील कवी गायक सुनील खरे तसेच शेखर गायकवाड, राखी चौरे, रोमियो कांबळे, मुन्ना भालेराव यांनी गीत गायनाच्या माध्यमातून प्रबोधन पर्वात रंगत आणली.