शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात नवीन निर्बंधामुळे कोरोना चाचणी करून घेण्यासाठी गर्दी वाढत आहे. पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यासह राज्य सरकार व महापालिका प्रशासनाने नव्याने घातलेल्या निर्बंधामुळे विविध आस्थापनावरील कर्मचारी, कारखान्यातील कामगार, नोकरदार आणि इतर वर्गातील अनेक नागरिकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी कोरोना चाचणी करून घेण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. सद्यस्थितीत कोरोना चाचणीसाठी चिंचवडमधील केएसबी चौक, मोहनगर इएसआयसी रुग्णालय, निगडीतील यमुनानगर येथे जावे लागते. आकुर्डी, निगडी प्राधिकरणातील जेष्ठ नागरिक, महिला, आजारी रुग्णांची चाचणीसाठी गैरसोय होते. चाचणीसाठी तासन तास रांगेत उभे राहावे लागते. तसेच, यंत्रणेवरील ताण वाढून रिपोर्ट देखील तीन तीन दिवस मिळत नाही. याचीच दखल घेऊन सुधारणा करत आकुर्डी, निगडी प्राधिकरण भागात कोरोना चाचणी केंद्र सुरू करावेत. अशी मागणी नगरसेविका शर्मिला बाबर यांनी महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या कडे केली आहे
शर्मिला बाबर यांनी निवेदनात म्हंटले आहे कि शहरातील विविध भागात महापालिका रुग्णालये आहेत. काही ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलेली आहेत. परंतु, निगडी प्राधिकरण, आकुर्डी भागात महापालिकेचे एकही कोविड रुग्णालय, तसेच कोविड केअर सेंटर नाही. तरी या भागातील नागरिकांची होणारी गैरसोय, आरोग्याचा व सुरक्षिततेचा विचार करून तातडीने नव्याने आकुर्डीत बांधलेल्या रुग्णालयात कोविड सेंटर महापालिकेने सुरू करावे