पिंपरी, 23 एप्रिल – नाशिक व वसई विरार येथील रुग्णालयांमधील दुर्दैवी व दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका, खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजन साठवणूक टाक्याची तपासणी आणि शहरातील सर्व रुग्णालयांमधील फायर व्यवस्थेचे तात्काळ ऑडिट करावे. आणि शहरातील रुग्णालयांमध्ये भविष्यात कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये तसेच रुग्णसेवा अखंडित राहून रुग्णांना कोणत्याही अडी अडीचणींचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांनी आज महापालिका प्रशासनाला केली.
याबाबत उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक येथील महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांचा तसेच वसई विरार येथील रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशा प्रकारची दुर्घटना आपल्या शहरातील महापालिका, खासगी रुग्णालयांमध्ये घडू नये यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या प्रचंड वाढू लागली. यातील बहुतेक रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने कोरोना समर्पित रुग्णालयांनी ऑक्सिजन साठवणूक टाक्या बसवायला सुरुवात केली आहे. तर काही रुग्णालयांनी आपली ऑक्सिजन साठवणूक क्षमता दुप्पट केली आहे. त्यामुळे भविष्यात ऑक्सिजन टाकीची गळती होऊन कुठल्याही प्रकारची दुर्घटना होणार नाही, याची खबरदारी घेण्याबाबतचे निर्देश सर्व संबंधित रुग्णालयांना प्रशासनामार्फत द्यावेत.
महापालिकेने शहरातील १०० खासगी रुग्णालयांना कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी दिली आहे. अशा रुग्णालयांमध्ये आय.सी.यू, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर सुविधा चालू करण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर रुग्णालयांमधील वातानुकुलीत यंत्रणा देखील सातत्याने चालू असते. नाशिक, वसई विरार येथील घडलेल्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका आणि इतर सर्व खासगी रुग्णालयातील फायर व्यवस्थेचे ऑडीट तातडीने करण्यात यावे. ऑडीट पाहणीमध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करण्याचे आदेश तात्काळ रुग्णालयांना द्यावेत. सदर त्रुटी दूर करण्यास रुग्णालयांनी टाळाटाळ अथवा हयगय केल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई करावी, अशी सूचना उपमहापौर घुले यांनी समक्ष भेट घेऊन निवेदनाव्दारे केली त्याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.