- म्युकरमायकोसीस आजाराबांबत योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश
- पुणे जिल्ह्याने लसीकरणामध्ये आघाडी ही कौतुकास्पद बाब
- ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्याच्या सूचना
- जादा बिल आकारणी करणा-या रुग्णालयांवर कारवाई करा
- ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन लवकरच उपलब्ध
शबनम न्युज / पुणे
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने उपाययोजना प्रभावीपणे राबवत संभाव्य लाट थोपविण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या. कोरोनाशी एकजुटीने सामना करू असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे जिल्ह्यातील कोरोना विषाणूची सद्यस्थिती, म्युकरमायकोसीसची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण आदी विषयांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. आरोग्य मंत्री राजेश टोपे,
यावेळी खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार वंदना चव्हाण, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवड महापौर उषा ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार अण्णासाहेब बनसोडे, आमदार सुनील टिंगरे, आमदार अतुल बेनके, आमदार चेतन तुपे, आमदार राहुल कुल, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, आमदार सुनील कांबळे, तसेच यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, टास्क फोर्सचे डॉ. डी. बी. कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गृहमंत्री वळसे पाटील पुढे म्हणाले, पहिल्या लाटेच्या तुलनेत आरोग्य विषयक सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे निश्चितच फायदा होतो आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यासाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे सुविधा निर्माण झाल्या आहेत. म्युकरमायकोसीस या नवीन आजाराची भर पडली आहे. हा आजार अचानक उद्भवतो. त्याचे उपचार महागडे आहेत त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, पुणे जिल्ह्याने लसीकरणामध्ये आघाडी घेतली आहे. लसीकरणासोबतच कोरोना चाचण्या वाढविण्याची गरज आहे.
कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांकडून जादा बिलाची आकारणी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे बिल आकारणी होते की नाही याबाबत दररोज तपासणी करावी. जादा बिल आकारणी करणा-या रुग्णालयांवर कारवाई करा. ज्या रुग्णांलयाबाबत जादा बिल आकारणीच्या जास्त तक्रारी आहेत त्या रुग्णालयांची प्रत्येक बिलाची तपासणी करावी. असे निर्देश त्यांनी दिले.
ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्याच्या सूचना देत आरोग्य मंत्री श्री. टोपे म्हणाले आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील नागरिकांना गृह विलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, संस्थात्मक विलगीकरणामुळे रुग्णाची दैनंदिन तपासणी होवून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण निश्चितपणे वाढेल. तसेच म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारांसाठी आवश्यक असलेले ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन लवकरच उपलब्ध होईल. यावेळी खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार वंदना चव्हाण, यांच्यासह उपस्थित आ. महोदयांनी महत्त्वाचे विषय मांडले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर कमी होताना दिसत आहे. लहान मुलांसाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा सुविधांची माहिती देवून पुणे जिल्ह्यातील रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, नागरिकांची नमुना तपासणी, बाधित रुग्ण, रुग्णालयीन व्यवस्थापन, रुग्णवाहिका व शववाहिका उपलब्धता, जम्बो कोविड रुग्णालय व्यवस्थापन, लसीकरण सद्यस्थिती, ऑक्सिजन व रेमडेसीवीर मागणी, पुरवठा कोविड-19 व म्युकरमायकोसिसचा रुग्णदर, मृत्युदर याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. तसेच ऑक्सिजन, रेमडेसीविरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांनी माहिती दिली. निर्बंधांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली.
बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.