पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सर्वकालीन आदर्श राज्यकर्त्या, राष्ट्रनिर्मात्या – उपमुख्यमंत्री अजित पवार
शबनम न्यूज / मुंबई
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जात, पात, धर्म, पंथ, प्रांतांच्या, सीमा ओलांडून संपूर्ण देशात लोकोपयोगी कार्याचा डोंगर उभा केला. देशभर मंदिरं, नदीघाट, धर्मशाळा, पाणपोयी बांधल्या. अनिष्ठ रुढी, प्रथा, परंपरा यांच्याविरुद्ध लढा दिला. त्या सर्वकालीन आदर्श राज्यकर्त्या, राष्ट्रनिर्मात्या आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यश्लोक, राजमाता, अहिल्यादेवी माँसाहेबांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महान योद्धा होत्या. कुशल प्रशासक, न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष, दानशूर राज्यकर्त्या होत्या. मुलकी आणि लष्करी प्रशासन वेगळे करुन कुशल राज्यकारभाराची चुणुक त्यांनी दाखवली. महिलांच्या सक्षमीकरणाचं काम केलं. महिलांना शिक्षण, प्रशिक्षण, अधिकार दिले. शेतकऱ्यांवरील, व्यापाऱ्यांवरील अन्याय दूर करुन प्रोत्साहन दिलं. लोककला, कलावंतांना आश्रय दिला. उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं धोरण स्वीकारलं. अहिल्यादेवी महान राज्यकर्त्या होत्या. थोर विचारवंत होत्या. त्यांचे विचार सुधारणावादी, अंधश्रद्धेवर प्रहार करणारे होते. त्यांचे कार्य, विचार जगभरातील राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला.