शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
भाजप आमदाराच्या कुटुंबातील सदस्याच्या नावाने असलेल्या क्रिस्टल कंपनीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात भ्रष्टाचार केला आहे. 100 हून अधिक कोटीचा आर्थिक घोटाळा केल्याचे पुरावे आम्ही सक्तवसुली संचालनालय (ईडी) कडे सादर करणार आहे. भाजप नेत्यांमध्ये खरच हिंमत असेल तर त्यांनी ईडी च्या चौकशीला सामोरे जावे. त्यातून दूध का दूध आणि पानी का पानी एकदा होऊन जाउद्या. असे आव्हान शिवसेना शहराध्यक्ष तथा नगरसेवक अॅड सचिन भोसले यांनी दिले.
भोसले म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीचे मुळात तीन नगरसेवक होते. 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फोडाफोडी करत महापालिकेवर भाजपला सत्ता मिळाली म्हणून आताची भाजपा निष्ठावंतांची नसून आयाराम -गयारामाची पार्टी बनली आहे. त्या पार्टीत मूळ भाजपचे नेते व नगरसेवक किती आहेत हे आशिष शेलार यांनी तपासून पाहावे. भाजपच्या नेत्यांना महापालिकेच्या सत्तेची सूज आली असून, महापालिकेच्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर खऱ्या अर्थाने कधी नव्हे ते शहराची फाळणी झाली आहे. शहरात दक्षिण-उत्तर संस्थाने वाटप करून भाजपच्या दोन आमदारांनी आपापल्या बगलबच्चे, कार्यकर्त्यांचे ठेकेदारी माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारत आहेत. या सत्तेतून भाजपच्या दोन्ही आमदारांनी किती कोटीची माया गोळा केली आहे. हे त्यांनाच माहिती आहे .त्यांनी केलेल्या भ्रष्टाचार आणि घोटाळ्यामुळे आता कळस गाठला आहे. या दोन्ही आमदारांची देखील ईडी अथवा राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करावी. अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहे. राज्यात महा विकास आघाडीचे सरकार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कचरा, पाणी, पर्यावरण, आरोग्य, भांडार, वैद्यकीय विभागातील ठेकेदारी टीडीआर, एफएसआय मिळवून देत हजारो कोटी रुपये भाजप नेत्यांनी स्वतःच्या घशात घातले आहेत. महापालिकेच्या प्रत्येक विभागातील भ्रष्टाचाराची माहिती घेऊन राज्य शासनाकडे पुराव्यानिशी माहिती देणार आहे. प्रत्येक निविदा व टेंडर प्रक्रियेची माहिती गोळा करण्यात येत आहे. सगळ्या प्रकरणाची राज्य शासनाकडे माहिती देऊन स्वतंत्र समिती गठीत करून अंदाधुत कारभाराची चौकशी करण्याची मागणी करणार आहे.
पिंपरी-चिंचवडच्या जनतेला दिलेला एकही आश्वासनांची पूर्तता सत्ताधारी भाजपने केलेली नाही. उलट त्यांनी सत्तेच्या धुंदीत महापालिकेची तिजोरी लुटून खाण्याचा प्रयत्न केलाय. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचाराची एक एक प्रकरण पुराव्यानिशी जनतेसमोर मांडणार आहे. त्या निवडणुकीत पिंपरी चिंचवड ची जनताच भाजप नेत्यांची कपडे फाडल्या शिवाय राहणार नाही. त्यामुळे कावळ्याने कितीही अंग धुतले तरी त्यांचा बगळा होत नाही, हे देखील त्यांनी लक्षात ठेवावे, असेही भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.