शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
प्रसार माध्यमांचा प्रभाव लक्षात घेता सकारात्मक विचारांचा प्रसार व्हावा, यासाठी रोज एक सुविचार, चांगली वाक्य, सुसंगतच चित्रांसह फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम वर ठेवून विचारांचा प्रसार करावा, असे आवाहन न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका मनीषा मिनोचा यांनी केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड प्रशालेत आज गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होत्या. गुरुपौर्णिमेचे महत्व, जीवनातील स्थान यावर मनीषा मिनोचा यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात शारदा देवीच्या ईशस्तवनाने करण्यात आली.
याप्रसंगी पालक-शिक्षक संघातर्फे गुरुवंदना, शिक्षक कौतुक सोहळा साजरा करण्यात आला. पालक प्रतिनिधी म्हणून रूपाली कनोजे आणि संतोष उभे यांनी अपल्या मनोगतात शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला. पाचवी ते दहावीच्या पालक प्रतिनिधींनी आपल्या वर्गाच्या वर्गशिक्षकांना गुलाबाचे रोप भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी उपशाळा प्रमुख दीपक अभ्यंकर, पालक प्रतिनिधी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. गुरुपौर्णिमा निमित्त प्रशालेत “आंतर वर्गीय गुरूपौर्णिमा” स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पर्यवेक्षिका अनिता भोसले यांनी आभार मानले तर रूपाली माळी यांनी सूत्रसंचालन केले.