शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड। प्रतिनिधी
आज आपल्या संपूर्ण भारत देशात रक्षाबंधन हा पवित्र भाऊ व बहीण यांचे नाते संबंध सांगणारा सण उत्साहात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील माजी महापौर, विद्यमान नगरसेवक राहुल जाधव यांच्या सौभाग्यवती, दत्त दिगंबर महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सौ मंगल ताई राहुल जाधव यांनी येथील अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचारी यांना राखी बांधून हा रक्षाबंधन सण साजरा केला.
पिंपरी-चिंचवड शहरात कोठेही आगे ची घटना घडली, कोणीही आगीसारख्या भयानक परिस्थितीत सापडला त्यांच्या संरक्षणासाठी अग्निशामक दल नेहमीच उभे राहते. आपल्या स्वतःची काळजी न करता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, अग्निशमन दलातील सैनिक हे नागरिकांच्या सेवेसाठी भयंकर आगीशी ही दोन हात करतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी, या भावनेने तसेच ज्याप्रमाणे बहिणीचे संरक्षण एक भाऊ करत असतो. तसेच अग्निशमन दलातील सैनिकही आपले संरक्षण करीत असतात. याच भावनेने हा रक्षाबंधनाचा सण मंगलताई राहुल जाधव यांनी अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून साजरा केला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी समाधान व्यक्त करीत मंगल ताई राहुल जाधव यांचे आभार व्यक्त केले.