- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्राधिकरण अन् विद्यापीठ सुरू करण्याची मागणी
- शैक्षणिक अभ्यासक्रम व प्रशासनात मराठी भाषेचे स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्न
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने ‘‘ महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक अभ्यासक्रमात व प्रशासनात मराठी भाषेचे स्थान अधिक बळकट करण्यासाठी मराठी भाषा विकास प्राधिकरण आणि विद्यापीठ स्थापन करावे. तसेच, याबाबत आगामी हिवाळी अधिवेशनात ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मराठी भाषा विकास प्राधिकरण आणि विद्यापीठ स्थापन करुन संबंधित संस्थेस अर्धन्यायिक दर्जा देण्यात यावा. अशी मागणी मराठीच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्यो २४ शिखर संस्थानी केली आहे. तसेच, प्राधिकरण स्थापन करण्यापूर्वी त्याचे स्वरुप कसे असावे? याबाबत आराखडा तयार करण्यात यावा. त्यासाठी मराठीच्या हितासाठी काम करणाऱ्या तज्ञांची एक परिषद आयोजित करण्यात यावी.
आगामी हिवाळी अधिवेशनात निर्णय घ्या : आमदार लांडगे
विविध क्षेत्रात मराठीचा होणारा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण होत जावा. यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करणे अपेक्षीत आहे. त्यासाठी शासनाने मराठी भाषेच्या अभिवृद्धीची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतिमान करावी. यासाठी प्राधिकरण स्थापनेमागील मुख्य उद्दीष्टे आहेत. त्यानुसार, सर्व स्तरांवर मराठीचा विकास साधण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे. अन्य राज्यांमध्ये त्या-त्या स्थानिक भाषेचे प्राधिकरण अस्तित्वात असून, अर्ध न्यायिक दर्जा संबंधित संस्थांना देण्यात आला आहे. मराठीला बोलीभाषेचे स्वरुप भविष्यात येवू नये. तसेच, दक्षिणेकडीत राज्यांप्रमाणे मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी मराठी विद्यापीठ स्थापन करण्याची गरज आहे. त्याबाबत आगामी हिवाळी अधिवेशनात सर्व कार्यवाही करुन मराठी प्राधिकरण आणि विद्यापीठाची घोषणा करावी, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.