पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन डेपोमध्ये आमदार मा. श्री. सुनिलभाऊ कांबळे यांच्या आमदार फंडातून पन्नास लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन
पुणे | प्रतिनिधी
पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन डेपोमध्ये आमदार मा. श्री. सुनिलभाऊ कांबळे यांच्या आमदार फंडातून पन्नास लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन
पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थात पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन डेपोमध्ये पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे भाजपचे आमदार मा. श्री. सुनिलभाऊ कांबळे यांच्या आमदार फंडातून पन्नास लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार मा. श्री. सुनिलभाऊ कांबळे व पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक श्री. दत्तात्रय झेंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
पुणे स्टेशन डेपोमध्ये पीएमपीएमएलच्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र असे २५ लाख रुपये खर्चाचे सर्व सोयींनी युक्त दुमजली विश्रांतीगृह तसेच प्रवाशी व पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज असे २५ लाख रुपये खर्चाचे दुमजली स्वच्छता गृह बांधण्यात येणार आहे. या विश्रांतीगृह व स्वच्छतागृहाचा भूमिपूजन समारंभ आज दिनांक २० सप्टेंबर २०२१ रोजी पार पडला.
याप्रसंगी पीएमपीएमएलचे वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी श्री. चंद्रकांत वरपे, स्थापत्य अभियंता श्री. निरंजन तुळपुळे, पुणे स्टेशन डेपो मॅनेजर श्री. संजय कुसाळकर, असिस्टंट डेपो मॅनेजर श्री. नंदकुमार आठवले, डेपो मेन्टेनन्स इंजिनियर श्री. विकास जाधव, पीडब्ल्यूडीचे उपकार्यकारी अभियंता श्री. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार मा. श्री. सुनिलभाऊ कांबळे म्हणाले,” पीएमपीएमएलच्या चालक व वाहक यांना कामामुळे ताण येतो. हा ताण घालवण्यासाठी हक्काचे विश्रांतीगृह असावे या हेतूने पुरुष व महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र अशा दुमजली विश्रांतीगृहाची उभारणी पुणे स्टेशन डेपोमध्ये करत आहे. बाहेरगावाहून पुणे स्टेशन डेपोमध्ये कामाला येणाऱ्या कर्मचार्यांची देखील या विश्रांतीगृहामुळे चांगली सोय होणार आहे. तसेच प्रवाशी व पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी सुसज्ज व स्वतंत्र अशा महिला व पुरुष दुमजली स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात येणार आहे. पीएमपीएमएलच्या सक्षमीकरणासाठी आम्ही आतापर्यंत प्रयत्न केले असून यापुढील काळातही प्रयत्नशील राहू. तसेच पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात कोरोना रुग्णांची चांगली सेवा केल्याचेही त्यांनी नमूद केले.”
पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक श्री. दत्तात्रय झेंडे म्हणाले,” पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचे असणारे विश्रांतीगृह व स्वच्छता गृह हे दोन्ही प्रश्न आमदार मा. श्री. सुनिलभाऊ कांबळे यांनी मार्गी लावलेले आहेत. यामुळे पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना उत्साहाने काम करण्यास प्रोत्साहन मिळेल. कोरोना काळात खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील अनेक संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्यात अडचणी आल्या. परंतु पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांच्या माध्यमातून वेळेवर वेतन मिळाले. तसेच लवकरच पुणे स्टेशन डेपो हा पूर्णपणे स्मार्ट इलेक्ट्रिक बस डेपो होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.”
पुणे स्टेशन डेपोचे कार्यालय अधीक्षक श्री. रवींद्र राऊत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डेपो मॅनेजर श्री संजय कुसाळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास श्री. पुरुषोत्तम लाखवडे, श्री. मंदार पवार, श्री. प्रभाकर देशमुख यांच्यासह पुणे स्टेशन डेपोतील कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.